
जर एखाद्याच्या घरात मुलगी जन्माला आली त्यासाठी देखील केंद्र सरकारला दोष दिला जाईल आणि मुलगा जन्माला आला तर ते स्वत:चं कर्तुत्व ठरवतील; असे वादग्रस्त वक्तव्य पंजाबमधील भाजपचे आमदार अश्वनी शर्मा यांनी केले आहे. पंजाबच्या विधानसभेत सत्ताधारी आप व विरोधक भाजप यांच्यात झालेल्या खडाजंगीच्या दरम्यान हे वक्तव्य केलं आहे. भाजप आमदार अश्विनी शर्मा यांनी मुलींच्या जन्माबाबत केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे सभागृहात मोठा गदारोळ झाला.

पंजाब विधानसभेत खाण मंत्री नरिंदर कुमार गोयल यांनी राज्यातील खाणकामातून मिळणाऱ्या महसुलावर बोलताना केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. गोयल म्हणाले, “केंद्र सरकारने मदत केली असती, तर अरविंद केजरीवाल यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे खाण महसूल २०,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असता. पंजाबचा विकास व्हावा असे केंद्र सरकारला वाटतच नाही. आम्ही बेकायदेशीर खाणकामाच्या प्रत्येक तक्रारीवर कारवाई करतो, एफआयआर नोंदवतो आणि या कारवाईसाठी आम्हाला केंद्र सरकारकडून कौतुकाचा पुरस्कारही मिळाला आहे.”
गोयल यांच्या आरोपावर बोलताना भाजप आमदार अश्विनी शर्मा म्हणाले की, कोणाच्या घरात मुलगी जन्माला आली तरी तो केंद्राचाच दोष ठरवला जातो. पण मुलगा झाला तर ते तुमच्या कष्टाचे फळ मानले जाते! तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी केंद्रालाच जबाबदार धरता’.
शर्मा यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी जोरदार विरोध दर्शवला. मंत्री अमन अरोरा शर्मा यांच्यावर टीका करताना म्हणाले, “तुम्ही मुलगा आणि मुलगी असा भेद करता का? आज मुली प्रत्येक क्षेत्रात यश मिळवत आहेत. तुमचे पंतप्रधान ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’चा नारा देतात, आणि दुसरीकडे तुमच्या वक्तव्यांमुळे मुलींची हेटाळणी होते. अश्विनी शर्मा यांनी राज्यातील प्रत्येक मुलीची कान पकडून माफी मागितली पाहिजे.”
वाढता वाद पाहता अश्विनी शर्मा यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. “हे वक्तव्य अयोग्य वाटत असेल तर ते कामकाजाच्या नोंदीतून काढून टाकावे, असे मी सभागृहात सांगितले. आम्ही घराबाहेर पडताना मुलींचे आशीर्वाद घेऊनच निघतो. माझ्या बोलण्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो,” असे शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.




























































