
क्वालालंपूर-कोची विमानात एका प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. तसेच सहप्रवासी व केबिन क्रूला धमकावल्याचा आणि दरवाजाच्या खिडकीचे पॅनेल खराब केल्याचा आरोप या प्रवाशावर करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सदर प्रवाशाला गुरुवारी अटक केली. जमशीर अथाणिक्कल असे आरोपीचे नाव आहे.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, केरळमधील कूटन्नाड येथील रहिवासी असलेला जमशीर ‘बटिक एअर’च्या OD231 या विमानातून बुधवारी क्वालालंपूर ते कोची प्रवास करत होता. विमान हवेत असताना रात्री 9.30 ते 11.05 वाजण्याच्या सुमारास जमशीरने आपत्कालीन दरवाजा बळजबरीने उघडण्याचा प्रयत्न केला, खिडकीचे पॅनेल खराब केले आणि सहप्रवाशांना धमकावले. केबिन क्रूने तत्काळ हस्तक्षेप करून त्या प्रवाशाला रोखले. गुरुवारी पहाटे 2.40 वाजता कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरताच आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने एक निवेदन जारी केले आहे. यात घटनेला दुजोरा देत विमानात गोंधळ निर्माण करणाऱ्या उद्दाम प्रवाशाला पोलिसांनी अटक केल्याचे म्हटले आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला नेडुंबसेरी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले. संबंधित विमान कंपनीने लागू नियमांनुसार आवश्यक प्रक्रिया सुरू केली आहे. आवश्यक तपासणी आणि दुरुस्तीनंतर, विमानाला उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली. यानंतर विमान आता परतीच्या प्रवासासाठी रवाना झाले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.




























































