
>> डॉ. समिरा गुजर-जोशी
युक्तोसि भुवनभारे मा पां वितनु कन्धरां शेष ।
त्वय्येकस्मिन्द्रः खिनि सुखितानि भवन्ति भुवनानि ।।
हे शेषनागा! तू संपूर्ण विश्वाचा भार वाहण्यास समर्थ आहेस. त्यामुळे हा भार वाहताना तुझी मान झुकू देऊ नकोस किंवा खचू देऊ नकोस. कारण या विश्वाचा आधार एकट्या तुझ्यावरच आहे. जर तू थकून गेलास किंवा डळमळीत झालास, तर सर्व भुवने अस्थिर होतील आणि त्यांचे सुख-कल्याण नष्ट होईल.
समाजातही काही व्यक्ती अशा असतात की ज्यांच्या धैर्य, संयम आणि कर्तव्यपरायणतेवर अनेकांचे जीवन अवलंबून असते. अशा व्यक्तींनी संकटसमयी खचून न जाता धैर्याने उभे राहिले, तरच इतरांचेही जीवन सुरक्षित आणि सुखी राहते. त्यामुळे हा श्लोक केवळ शेषनागाचे स्तवन नसून, कर्तव्याची जाणीव, मानसिक स्थैर्य आणि जबाबदारीची जपणूक यांचा अत्यंत प्रभावी संदेश आहे.



























































