
>>प्रा. समीर जाधव<<
कर्नाटकी संगीत ही भारतीय कला परंपरेची अमूल्य देणगी आहे. राग, ताल, भक्ती, शास्त्रीय शिस्त आणि भावपूर्ण सादरीकरण यांचा सुंदर संगम म्हणजे कर्नाटकी संगीत होय. आजही भारतात आणि जगभरात कर्नाटकी संगीताच्या अभ्यासाला, संशोधनाला आणि सादरीकरणाला महत्त्व आहे.
कर्नाटकी संगीताची मुळे वैदिक परंपरेतील सामवेदापर्यंत पोहोचतात. पुढे नाटय़शास्त्र, संगीत रत्नाकर आणि विजयनगर साम्राज्याच्या काळातील संगीत विकासामुळे ही परंपरा अधिक समृद्ध झाली असली तरी नायक आणि मराठय़ांच्या राजवटीतील तंजावर हे कर्नाटकी संगीताच्या विकासाचे, समृद्धीचे मुख्य केंद्र होते. तंजावरच्या नायक आणि मराठा राजांनी संगीताला प्रोत्साहन दिले. कर्नाटकी संगीताच्या बाबतीत नायकांनी तंजावरला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. राजवाडय़ाच्या आवारात असलेला आणि आजही वापरात असलेला संगीत महाल सेवप्पा नायक याने बांधला. हे बांधकाम भरतमुनींच्या नाटय़शास्त्रानुसार करण्यात आले होते. नायक राजांमध्ये रघुनाथ आणि त्याचा पुत्र विजयराघव यांनी संगीतासाठी सर्वाधिक योगदान दिले. जगभरात प्रसिद्ध असलेली तंजवार वीणा ही रघुनाथ नायकाच्या काळातच निर्माण झाली. रघुनाथ नायकला या वीणेचे जनक मानले जाते. काही अभ्यासकांच्या मते रघुनाथ नायकाच्या आज्ञेवरूनच गोविंद दीक्षितार यांनी वीणेमध्ये 24 स्थिर पडदे लावून बदल केला आणि सरस्वती वीणा तयार केली. हीच वीणा तंजावर वीणा म्हणून ओळखली जाते.
तंजावर वीणा तयार करण्याची कला ही तंजावरच्या कारागीरांची खासीयत आहे. नायक राजांच्या काळात तंजावरमध्ये पदम हा गीत प्रकार विकसित आणि अत्यंत प्रसिद्ध झाला. पदम या लहान संगीत रचना आहेत, ज्या गायल्या जात आणि ज्यावर नृत्य केले जात असे. तंजावरची पदमं नेहमीच भक्तिपूर्ण स्वरूपाची असत. ती स्त्राr आवाजात गायली जात आणि दरबारातील व मंदिरांतील देवदासी त्यावर नृत्य करत असत. नायक दरबारात स्त्रियांनाही एक विशेष स्थान होते. दरबारातील इतर प्रसिद्ध संगीतकारांमध्ये कृष्णंबा आणि लीलावती यांचा समावेश होता, ज्या स्वत दरबारी स्त्रिया होत्या. नायकांनंतर मराठय़ांनी संगीताला आश्रय देण्याची परंपरा पुढे चालू ठेवली. त्यांनी आपली स्वतची संगीत परंपरा विद्यमान परंपरेत सुसंवादाने समाविष्ट केली. 1684 ते 1855 पर्यंतच्या सर्व मराठा राजांना संगीताची आवड होती. त्यांनी गीते रचली आणि दरबारी पुरुष व महिला संगीतकार आणि कवींना भरभरून आश्रय दिला. शहाजीराजे भोसले, तुकोजीराजे भोसले आणि सर्फोजी द्वितीय यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. शहाजीराजे आणि तुकोजीराजे या दोघांच्याही दरबारी संगीतकारांनी केवळ संगीत रचनाच केली नाही, तर गोविंद दीक्षितार आणि व्यंकटमखी यांच्या संगीत संहिताकरणाच्या कार्याचा विस्तारही केला. मराठा दरबारात प्रबंधम हा प्रकार समृद्ध झाला. शहाजीराजे भोसले हे प्रबंधमचे प्रणेते मानले जातात. त्यांनी 22 प्रबंधम रचल्याचे उल्लेख आढळतात. मराठा राजवटीत रामदासी कीर्तन आणि भजन यांच्या सोबत लावणी हे महाराष्ट्रातील लोककला प्रकारही अधिक प्रचलित झाले.
तंजावरला समृद्ध अशी लोक संगीताची परंपरा आहे, जी आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. मंदिरांतील आणि राजवाडय़ांतील लोकांप्रमाणेच सामान्य लोकांचे जीवनही नेहमी संगीतात न्हाऊन निघालेले होते. त्यांची जात, समुदाय, व्यवसाय याला महत्त्व नव्हते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला तंजावरचा संगीताचा वारसा झपाटय़ाने लोप पावला. तंजावरमधील उत्तम संगीतकार प्रामुख्याने ब्राह्मण समाजातील होते आणि तंजावरमध्ये अधूनमधून मिळणाऱ्या संधींपेक्षा त्यांनी मद्रास किंवा चेट्टीनाडमधील अधिक खात्रीशीर आश्रयाला पसंती दिली. आज तंजावरमधील संगीताची तुलना नायक आणि मराठा संगीताच्या सुवर्णकाळाशी करता येणार नाही. तंजावरला आता कोणतेही व्यावसायिक महत्त्व राहिलेले नाही.
(लेखक तंजावरची कला, संस्कृती, साहित्य याचे अभ्यासक आहेत.)



























































