
एक खेळाडूच दुसऱ्या खेळाडूचे प्रयत्न, मेहनत, चिकाटी आणि जिद्द समजू शकतो. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या आयुष्यातही अशा काही विपरीत गोष्टी घडल्या, पण त्याने हार मानली नाही. एका मोठ्या स्तरावर गेल्यावर मात्र कोहली युवा खेळाडूंच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. ही फक्त क्रिकेटपुरती मर्यादित गोष्ट नाही, तर नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या साक्षी चौधरीलाही विराटने मदत केल्याचे समोर आले आहे. साक्षीने सुवर्णपदक जिंकले, पण आपल्याला पडत्या काळात मदत करणाऱ्या विराटला ती विसरली नाही. भारतात परतल्यावर साक्षीने विराटचे जाहीर आभार मानले असून त्याचा या सुवर्णपदकात कसा हातभार होता, हेदेखील तिने सांगितले आहे. महिला बॉक्सरने राष्ट्रकुल स्पर्धेत अविस्मरणीय यश संपादन केले. यामध्ये साक्षीचाही समावेश होता. साक्षीने महिलांच्या ५१ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर भारतात परतल्यानंतर साक्षीने सांगितले की, माझ्या या प्रवासात विराटने महत्त्वाची भूमिका बजावली आणि तिने त्याचे आभार मानले.
विराटने कशी केली साक्षीची मदत… हरयाणातील भिवानी येथे बोलताना साक्षी चौधरी म्हणाली, ‘मी विजेंदर सिंगला पाहून बॉक्सिंगला सुरुवात केली. या प्रवासात विराटनेही मला खूप मोठा आधार दिला आहे. तो माझा प्रायोजक आहे आणि मला त्याचेही आभार मानायचे आहेत.’ तिने स्पष्ट केले की, कोहलीने केवळ आर्थिक मदतच केली नाही, तर तिला मानसिक प्रोत्साहनही दिले. साक्षीच्या मते, विराट तिला नेहमी दडपणापासून दूर राहून केवळ तिच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला द्यायचा. त्याचा तिला फायदा झाल्याचे तिने म्हटले आहे.
वजन गट बदलून विजय ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत साक्षीने महिलांच्या ५१ किलो वजनी गटात इंग्लंडच्या रुबी व्हाईटला ५-० ने पराभूत करून सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील हे तिचे पहिले पदक होते. २०२२ मध्ये दुखापतीमुळे ती या स्पर्धेत सहभागी होऊ शकली नव्हती. २०२५ मध्ये तिने वर्ल्ड बॉक्सिंग कपमध्ये ५४ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. या वर्षाच्या सुरुवातीला साक्षीने ५४ किलोवरून ५१ किलो वजनी गटात जाण्याचा निर्णय घेतला. हा एक जोखमीचा निर्णय होता, पण साक्षीने सुवर्णपदक जिंकले. ५१ किलो वजनी गटाच्या राष्ट्रीय चाचण्यांमध्ये, तिने २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती निखत झरीन आणि २०२५ च्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधील सुवर्णपदक विजेती मीनाक्षी हुडा यांना पराभूत करून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले. साक्षी चौधरीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चार सामने खेळले आणि ते चारही सामने ५-० अशा एकतर्फी फरकाने जिंकले.

























































