
शिवसेनेतून फुटलेले गद्दार खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जोरदार हल्ला चढवला. ‘शिवसेना पक्ष व चिन्हाची सुनावणी न्यायालयात सुरू असताना हे गद्दार मोदींना का भेटले? ‘भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे,’ असे गद्दारांना सांगून, मोदी कुणाला धमकी देत आहेत. ते सर्वोच्च न्यायालयाला धमकावत आहेत का,’ असा रोकडा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. न्यायालयाने याची दखल घेऊन मोदींना जाब विचारला पाहिजे, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.
‘मातोश्री’ निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी यावेळी मराठी, हिंदी वर्तमानपत्रांतील हेडलाइन्स पत्रकारांना दाखवून गद्दार खासदारांच्या पंतप्रधानांसोबतच्या भेटीगाठींचा खरपूस समाचार घेतला. ‘सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमुळे शिंदे टेन्शनमध्ये’ अशा बातम्या काही ठिकाणी आल्या आहेत. हे टेन्शन दूर करण्यासाठी पंतप्रधान मोदी त्या गद्दार खासदारांना भेटले का,’ असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला.
देशातील जेन-झीने भाजप सरकारला कसे गुडघ्यावर आणले याची चर्चा सध्या जगात सुरू आहे. पण या पिढीला आधार देण्याऐवजी त्यांच्यावर जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण यावी अशा निर्घृणपणे अत्याचार केले गेले, अशी खंत व्यक्त करताना उद्धव ठाकरे संतापून म्हणाले, ‘आपल्या न्याय्यहक्कांसाठी लढणाऱ्या या मुलांना भेटण्यात मोदींना कमीपणा वाटतो. त्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, संसदेत यायला वेळ नाही, पण शिवसेना चोरून ‘शहा सेना’ स्थापन करणाऱ्या व शिवसेना म्हणून मिरवणाऱ्या गद्दारांना भेटायला त्यांच्याकडे वेळ आहे.’
हा धमकीवजा संदेश कोर्टाला, शहांना, फडणवीसांना की संभाव्य गद्दारांना?
‘भिऊ नका मी तुमच्या पाठीशी आहे हे मोदींनी खरेतर आंदोलक तरुणांना सांगायला हवे होते. मात्र गद्दारांना बेशरमपणाने भेटून त्यांनी हे सांगितले. हे फार विचित्र आहे. हा धमकीवजा संदेश त्यांनी नेमका कुणाला दिला, न्यायालयाला दिला, अमित शहांना दिला, देवेंद्र फडणवीसांना दिला, प्रशासनाला दिलाय की इतर पक्षातल्या संभाव्य गद्दारांना दिलाय याचा खुलासा झाला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘ही बाब गंभीर असून ती सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्या’, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांना दिल्या.
आता गद्दारांचा बॉस बदललाय
‘पूर्वी गद्दार शहासेनेचे प्रमुख अमित शहा यांना भेटायचे. आता त्यांचा बॉस बदललाय. शहा महाराष्ट्रात असताना गद्दार मोदींना भेटतात,’ याकडेही उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले.
आज संपूर्ण देश आणि विरोधी पक्ष पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे उत्तर मागतोय की, तरुणांवर अत्याचार का केले? मात्र पंतप्रधानांची बोलण्याची तयारी नाही आणि गृहमंत्र्यांची हिंमत नाही.
गद्दारांना आता नेमके भय कसले आहे? वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यानंतरही त्यांची पळापळ का होतेय? शेपटय़ा घालून ते मोदींकडे का धावताहेत? भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गद्दारांच्या शरीरावरचे डाग धुतले गेले, पण गद्दारीचा डाग धुतला जात नाहीए. तो धुणारी वॉशिंग मशीन अद्याप भाजपकडं नाही.
काँग्रेसला 60 वर्षांत जमले नाही ते भाजपने केले
काँग्रेसला गेल्या 60 वर्षांत जमले नाही ते भाजपने करून दाखवले, असा उपरोधिक टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला. ‘काँग्रेसवाल्यांनी कधीच त्यांच्या डोळय़ादेखत जेवढय़ा शिव्या खाल्ल्या नव्हत्या, तेवढय़ा शिव्या आणि नालस्ती माननीय पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांच्या वाटय़ाला आली आहे, असा चिमटा त्यांनी काढला. देशातली सध्याची परिस्थिती पाहता कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे आणि ही वादळापूर्वीची शांतता आहे, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
कोर्टाच्या निकालावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होतोय का?
गेल्या चार वर्षांपासून शिवसेना पक्षाच्या बाबतीतील प्रलंबित असलेल्या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे. ती जवळजवळ अंतिम टप्प्यात आली आहे. न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याने आजपर्यंत आपण त्यावर कधीच बोललो नाही. न्यायालयाबद्दल शिवसेनेला आदर आहे आणि शिवसेनेला संविधानाप्रमाणे निकाल हवा आहे. संविधानाप्रमाणे पाहिले तर गद्दार सरकार स्थापन करूच शकत नव्हते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. गद्दार खासदार मोदींना भेटले त्याचा परिणाम सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर होणार नाही, पण तसा प्रयत्न भाजपकडून केला जातोय असा संशय मोदी-गद्दार भेटीतून निर्माण झालाय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तमाम देशभक्तांना आवाहन
‘गद्दारीचा व्हायरस संपूर्ण देशात पसरलाय. ही लढाई आता शिवसेनेपुरती मर्यादित राहिली नाही. लोकशाही आणि संविधानाबद्दल ज्यांना प्रेम आहे, ज्यांना लोकशाही आणि संविधान वाचवायचे आहे, त्या सर्व देशभक्तांनी या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले.
शहांचा राजीनामा घेऊन सरसंघचालकांनी तरुणांशी बोलावे!
सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकताच जेन झींशी संवाद साधला. त्यावरूनही उद्धव ठाकरे यांनी फटकेबाजी केली. ‘हा भागवतांनी केविलवाणा प्रयत्न केला. तरुणाई त्यांचे ऐकण्याच्या मानसिकतेत नाही. आम्हाला प्रवचने देऊ नका. सरकार तुमचे आहे. तुम्ही आणले आहे. त्यात सुधारणा करायला लावा. हे सरकार तरुणांशी निर्घृणपणे वागत असताना तुम्ही गप्प का होता, तरुणांना जाऊन का भेटला नाही असे तरुणच विचारत आहेत,’ याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले. भाजप संघाचे ऐकत असेल तर सरसंघचालकांनी अमित शहांचा राजीनामा घेऊन नंतर तरुणांशी संवाद साधायला हवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मोदी नवे स्वामी झालेत का?
उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्वामी समर्थांच्या उपदेशाची आठवण करून दिली. ते म्हणाले, ‘स्वामी समर्थांच्या चरणी आपण संकटकाळी लीन होतो. ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ असे त्यांचे वाक्य आहे. बंद दाराआडील चर्चेनंतर नेमके तेच वाक्य बाहेर आणले गेले. त्याचे कारण काय? मोदी नवे स्वामी झालेत का?’
सरकार इन्स्टाग्रामवर
जेन-झी आंदोलनानंतर पंतप्रधान मोदींनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओवरून उद्धव ठाकरे यांनी टोला हाणला. ते म्हणाले, ‘कोरोना काळात मी फेसबुक लाइव्ह करत होतो, तेव्हा फेसबुकवरून सरकार चालत नाही असे उपदेश भाजपवाले देत होते. आता त्यांच्यावर इन्स्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ आलेली आहे.’
देशाच्या राजकारणात सध्या मतलबी वारे सुरू आहेत. जे विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षाकडे वाहतात. त्यांना वाटतं की, विरोधी पक्ष थंड झाला, पण शिवसेना थंड होणाऱ्यांपैकी नाही. – उद्धव ठाकरे



























































