
सर्वसामान्य नागरिकांवर महागाईची कुऱ्हाड कोसळण्याची भीती आहे. इराण युद्ध आणि आखाती देशांमधील तणावामुळे कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे देशातील प्रमुख एफएमसीजी कंपन्या सप्टेंबर तिमाहीत उत्पादनांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. तसे झाल्यास ऐन सणासुदीमध्ये रोजच्या वापराच्या चहा, बिस्कीट, तेल, साबण, पीठ, तांदूळ, मसाले, टूथपेस्ट इत्यादी वस्तू महाग होण्याची शक्यता आहे.
एफएमसीजी कंपन्यांनी एप्रिल-जून तिमाहीत सरासरी 2 ते 5 टक्के दरवाढ केली, तर जुलै-सप्टेंबर या तिमाहीमध्ये किमती स्थिर ठेवल्या, मात्र पॅकेटमधील वस्तूचे वजन कमी केले.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या मालाच्या किमतीत सातत्याने उतारचढाव होत आहे. पाम तेल, साखर, कच्च्या तेलाच्या अस्थिर किमतीमुळे कंपन्याच्या मार्जिनवर परिणाम होत आहे.
पुड्यात दहाऐवजी आठ बिस्किटे!
बिस्कीट उत्पादक कंपनी ब्रिटानियाकडून बिस्किटांच्या पाकिटांचे वजन घटवणार आहे. प्रामुख्याने 5 आणि 10 रुपयांच्या पॅकमध्ये हा बदल दिसू शकेल. म्हणजे, आधी 10 बिस्किटे मिळत होती, तर त्याऐवजी 8 बिस्किटे मिळतील. हिंदुस्थान युनिलिव्हरदेखील विविध उत्पादनांच्या किमतीत 2 ते 5 टक्के दरवाढ करण्याचा विचार करत आहे. गोदरेज कन्झ्युमरदेखील दरवाढ करू शकते.





























































