नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गासाठी एल्गार! संगमनेरातील हिवरगाव पावसा येथे चक्काजाम; वाहनांच्या लांबच लांब रांगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक-पुणे हा रेल्वेमार्ग सरळ व्हावा, याकरिता संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिकांनी एकत्र येत संगमनेरातील हिवरगाव पावसा येथे तीन तास चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनात नागरिक महिला व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या हायस्पीड रेल्वे मार्गाकरिता केंद्र व राज्य सरकारच्या सर्व मंजुरी मिळालेल्या असताना हे काम थांबले कसे, असा सवाल करताना जेथे रेल्वेचे काम थांबले तेथूनच काम सुरू करा, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्र व राज्य सरकारला केले. नाशिक-पुणे रेल्वे ही सरळ मार्गे झाली पाहिजे, यासाठी तरुणाईचा एल्गार असलेल्या आंदोलनाने केंद्र सरकारचे लक्ष वेधले.

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे सर्वपक्षीय नागरिक, महिला, युवक, विद्यार्थी, शेतकरी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भव्य ‘रास्ता रोको’ झाला. तीन तास झालेल्या या आंदोलनात संगमनेर, अकोल्यातून अनेक नागरिक उपस्थित होते. ‘रेल्वे आमच्या हक्काची,’ ‘नाशिक-पुणे सरळ रेल्वे झालीच पाहिजे,’ या घोषणांनी परिसर दुमदुमला. रिमझिम पावसामध्येही हजारो नागरिक तीन तास रस्त्यावर बसून होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले, नाशिक-पुणे सरळ रेल्वेसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. 2019 मध्ये सरकार सत्तेवर आल्यानंतर अधिक पाठपुरावा करताना दिवंगत अजितदादांनीही मदत केली. केंद्र सरकार, नीती आयोग, राज्य सरकार, रेल्वे या सर्व विभागांच्या या सरळ मार्गासाठी मान्यता मिळालेल्या आहेत. राज्य सरकारने 1000 कोटी रुपये रेल्वेला दिले. त्यानंतर भूसंपादन सुरू झाले.

गोल्डन ट्रँगलसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सरळ रेल्वे मार्गाचे काम थांबण्याचे कारण कळत नाही. या चांगल्या कामात कुणी खोडा घातला? हा सवाल करताना सर्व मंजुरी मिळताना जीएमआरडीची कोणतीही अडचण आली नव्हती. आताच अडचण आली कशी, असा प्रश्न त्यांनी केला. याचबरोबर पालकमंत्री विखे-पाटील यांचे नाव न घेता, साईबाबांचा चांगल्या कामाला आशीर्वाद असतो. चांगल्या कामात कुणी राजकारण करू नये, अशी टीका केली तर काही मंडळी नेहरू गार्डनच्या रेल्वे पलीकडे जात नाही, अशी टीका नाव न घेता अमोल खताळ यांच्यावर केली.

शास्त्र्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्याप्रति आम्हाला आदर आहे. परंतु समिती नेमून पुन्हा शून्यापासून काम सुरू होणार आहे. त्यामुळे झालेले काम वाया जाणार आहे. समिती आली म्हणजे धोका आहे. हा खेळ जनतेच्या भावनेशी आहे, विकासाशी आहे. या सरळ रेल्वे मार्गामुळे देशाशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. येथील शेतकरी, व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी, तरुण यांना मोठय़ा संधी निर्माण होणार आहेत. या रेल्वेमध्ये कोणीही राजकारण करू नये. सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले.

पद्मश्री रघुवीर खेडकर, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात, प्रा. हिरालाल पगडाल, रामहरी कातोरे, ‘छात्र भारती’चे अनिकेत घुले, डॉ. कोल्हे, अमर कतारी, विश्वासराव मुर्तडक, सीताराम राऊत, उत्कर्षा रूपवते, अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे यांनीही सरकारच्या धोरणांवर टीका केली. या आंदोलनासाठी हजारो नागरिक नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या गांधी टोप्या घालून आंदोलनामध्ये हजर होते. प्रांताधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी निवेदन स्वीकारले.

आमदार तांबे यांना अटकेच्या बातमीने आंदोलक आक्रमक

नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गावर शांततेत आंदोलन सुरू होते. संगमनेर, सिन्नर, नारायणगाव, आळेफाटा, चाकण येथे सुरू असलेल्या आंदोलनाची दखल सर्व माध्यमांनी घेतली. केंद्र सरकारपर्यंत या आंदोलनाची धग पोहोचल्यानंतर आमदार सत्यजित तांबे यांना अटक करण्यात आली. ही बातमी माध्यमांवर झळकल्यानंतर संगमनेरमधील आंदोलकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. याचबरोबर आंदोलनस्थळी कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले. उपस्थित हजारो तरुणांची आक्रमकता पाहून माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात यांनी आंदोलकांना शांत केले.