
शहरातील मुकुंदनगर परिसरात पथदिवे दुरुस्तीच्या कामासाठी गेलेल्या कंत्राटी महापालिका कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले धीरज कचरूसिंग रजपूत-परदेशी यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर संपली. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच हल्ल्याच्या पूर्वनियोजित कटाच्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेतील तीन आरोपी आणि त्यांना पळून जाण्यास मदत करणाऱया दोघांना पोलिसांनी 24 तासांत अटक केली आहे.
मनपा विद्युत विभागाने पथदिवे दुरुस्तीसाठी ई-स्मार्ट संस्थेची नियुक्ती केली आहे. या संस्थेमध्ये धीरज रजपूत हेल्पर म्हणून कार्यरत होते. पथदिवे दुरुस्तीचे काम करण्यासाठी अक्षय कैलास मुळे, काव्य गणेश तावरे आणि धीरज रजपूत असे तिघे शुक्रवारी (दि. 7) सायंकाळी मुकुंदनगरमधील दर्गा दायरा कब्रस्तान परिसरात गेले होते.
मुळे आणि तावरे हे इमारतीवर गेले असताना धीरज खाली थांबले होते. त्याचवेळी काहीजण तेथे आले आणि त्यांनी धीरज यांच्यावर लोखंडी दांडक्याने हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. धीरज यांना वाचविण्यासाठी मुळे आणि तावरे यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या धीरज यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच आज त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणात मनपा विद्युत विभागात वायरमन असलेल्या युनूस शेख याला पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. युनूस शेख यानेच अक्षय मुळे यांना फोन करून मुकुंदनगर येथे दुरुस्तीचे काम असल्याचे सांगितल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे हा अचानक झालेला वाद नसून नियोजनबद्ध पद्धतीने हल्ला केला का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. अक्षय मुळे यांच्या फिर्यादीवरून मेहराज अस्लम सय्यद, सिराज अस्लम सय्यद, मुस्ताकिम अस्लम सय्यद यांच्यासह अन्य तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांची संख्या सहा ते सात असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. धीरज रजपूत यांच्या मृत्यूची माहिती समोर येताच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली असून, सर्व आरोपींना अटक करून हल्ल्यामागील सूत्रधाराचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.
नागरिकांनी संयम बाळगावा; पोलिसांचे आवाहन
मनपा कर्मचारी धीरज परदेशी यांच्या मृत्यूची माहिती समोर येताच शहरात खळबळ उडाली. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने बंदोबस्त तैनात केला. नागरिकांनी कोणत्याही प्रकारची गडबड करू नये, कायदा हातात घेऊ नये आणि संयम राखावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांनी केले आहे. दरम्यान, दुपारी अनेक भागांमध्ये दुकानेही बंद करण्यात आली होती. जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या किंवा शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
टिळा लावला म्हणून मारले; पत्नीच्या आरोपाने खळबळ
‘माझ्या नवऱ्याने टिळा लावला होता म्हणून त्यांना मारले,’ असा आरोप धीरज परदेशी यांच्या पत्नीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासमोर केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. पालकमंत्री विखे यांनी रुग्णालयात जाऊन परदेशी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला तसेच हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
संरक्षण देता येत नसेल तर नागरिकांना बंदुका द्याव्यात
शिवसेनेचा संताप
महापालिका कर्मचारी धीरजसिंग परदेशी यांच्या हत्येच्या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून उर्वरित फरार आरोपींना तत्काळ अटक करावी. तसेच या गुह्यामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्यालाही तत्काळ अटक करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महानगरप्रमुख किरण काळे यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. अहिल्यानगरकरांना संरक्षण देता येत नसेल तर सरकारने नगरकरांना स्वसंरक्षणासाठी बंदुका द्याव्यात, असा संतापही काळे यांनी व्यक्त केला.
रुग्णालयाबाहेर हिंदुत्ववाद्यांचा ठिय्या
महापालिका कर्मचारी धीरज परदेशी यांच्या मृत्यूची बातमी समजताच शहरात संतापाची लाट उसळली असून, रुग्णालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. मोठय़ा संख्येने हिंदुत्ववादी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. आरोपींवर कठोर कारवाई करून सर्वांना अटक होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा आक्रमक इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.




























































