
वृक्ष म्हणजे केवळ निसर्ग आणि सौंदर्य नव्हे तर आपण सर्वजण घेतो तो निरोगी श्वास आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पेणचे नायब तहसीलदार प्रसाद कालेकर यांनी केले आहे. अक्षर विद्यालयाने झाडांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्याची सुरू केलेली परंपरा कौतुकास्पद असल्याचे गौरव उद्गारही त्यांनी काढले.
इको फ्रेंडली स्कूल म्हणून रायगडमध्ये प्रसिद्ध असलेल्या अक्षर विद्यालयात झाडांचा वाढदिवस विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला. केक कापताच सर्वांनी हॅपी बर्थ डे म्हणत टाळ्यांचा कडकडाट केला. गेली २६ वर्षे ही परंपरा सुरू आहे. ही परंपरा इतर शाळांनीही सुरू करावी, असे आवाहन नायब तहसीलदार प्रसाद कालेकर यांनी केले. शाळेचे संस्थापक, अध्यक्ष विजय पाटील, संचालक राहुल म्हात्रे, माजी सरपंच प्रदीप म्हात्रे, केंद्रप्रमुख प्रमोद पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रामचंद्र पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन एस. जे. खरजे यांनी केले. सजावट गणेश डोंगर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी केली होती. यावेळी शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दिया नाईक, मानव पाटील, भूमिका ठाकूर या गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
वृक्षसंवर्धनाचा अक्षर विद्यालय पॅटर्न
शिक्षण क्षेत्रामध्ये एकेकाळी लातूर पॅटर्न उदयास आला होता. त्याच धर्तीवर पर्यावरण क्षेत्रात आता वृक्षारोपणाचा व वृक्षसंवर्धनाचा अक्षर विद्यालय पॅटर्न निर्माण झाला आहे. अक्षर विद्यालय याच्याच धर्तीवर राज्यातील अनेक शाळा, सेवाभावी संस्था व गावागावांमध्ये आता हा वृक्ष वाढदिवस साजरा केला जात आहे. त्यामुळे वनसंवर्धन व पर्यावरणाबाबत जनजागृती होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.






























































