
सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा आता अंबरनाथ, कल्याण परिसरात तब्बल 1400 घरे उभारणार आहे. पीएमएवाय 2.0 अंतर्गत पुढील तीन वर्षांत ही घरे उभारली जाणार आहेत. यापैकी 950 घरांचे काम सुरू असून 450 घरे मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत.
मुंबईत घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. त्यामुळे स्वस्तात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्यांची पसंती मुंबईच्या आसपास असलेल्या शहरांना मिळतेय. नागरिकांचा कल पाहता म्हाडाच्या कोकण मंडळाने अंबरनाथनजीक कोहोज पुंठवली येथे 600 घरांचे काम सुरू केले आहे. मोरीवली येथे 102 घरे उभारली जाणार असून त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. कल्याणनजीक गोठेघर येथे 350 घरांचे काम सुरू आहे. शिवगंगा नगर 350 घरांचे नियोजन असून त्याच्या आराखडय़ाला मंजुरीची प्रतीक्षा सुरू आहे. मोरीवली येथे 102 घरे पुढील एक ते दोन वर्षांत उभारली जाणार आहेत तर उर्वरित घरे तीन वर्षांत पूर्ण करून म्हाडा त्यांची लॉटरीद्वारे विक्री करण्याचे म्हाडाचे नियोजन आहे.
अशा असणार किमती
म्हाडाकडून पीएमवाय 2.0 अंतर्गत उभारली जाणारी ही घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी असणार आहेत. 320 चौरस फूट चटई क्षेत्रफळ असलेल्या या घरांची किंमत 25 लाखांच्या घरात असणार आहे. म्हाडाच्या मालकीच्या जागेवर ही घरे उभारण्यात येणार असून उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे या घरांना पसंती मिळेल असा म्हाडाला विश्वास आहे.































































