माझ्या बॅगेत बॉम्ब… मुंबई विमानतळावर खळबळ, पोलिसांनी दट्ट्या देताच प्रवाशाचा खोडसाळपणा उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विमानतळावर एका प्रवाशाला खोडसाळपणा चांगलाच अंगलट आला आहे. मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात एका प्रवाशाने माझ्या बॅगेत बॉम्ब आहे अशी खोटी अफवा पसरवली. यानंतर प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. विमानतळ प्रशासनाने तात्काळ विमानाचे उड्डाण रद्द केले. यानंतर सदर प्रवाशाला खाली उतरवून ताब्यात घेण्यात आले. प्रवाशाची काही तास कसून चौकशी केल्यानंतर विमानाचं उड्डाण करण्यात आलं.

टीव्ही 9 मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानातील एका प्रवाशाने सुरक्षा तपासणीदरम्यान माझ्या बॅगेत बॉम्ब आहे असे सांगितले. अनुज जयराम सुवर्णा असे प्रवाशाचे नाव आहे. सीआयएसएफने तात्काळ विमानातून खाली उतरवत ताब्यात घेतले. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले. बॉम्ब शोधक पथकाने विमान, कार्गो आणि सर्व सामानाची कसून तपासणी केली. तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. यानंतर विमान दिल्लीला रवाना करण्यात आले.

आरोपीला सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस चौकशीत आपण मस्करीत बॉम्ब असल्याचे बोललो असा दावा आरोपीने केला. पोलिसांनी आधी गुन्हा नोंदवत त्याला अटक केली होती. मात्र नंतर समज देऊन सोडून दिले.

मुंबई विमानतळावर प्रवाशाकडून बॉम्बची खोटी धमकी. दिल्लीचं विमान उडण्यापूर्वी थांबवण्याची वेळ, प्रवाशाने सांगितले की माझ्या बॅगेत बॉम्ब आहे. यानंतर विमानातून खाली उतरवून ताब्यात घेतले आहे.