तळेगाव येथील बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, तेलंगणातील दोघांसह पाच जणांना अटक; नाशिक पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तळेगाव येथील एका बंगल्यातील बनावट नोटांचा कारखाना नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांनी आज सकाळी उद्ध्वस्त केला. या प्रकरणी तेलंगणा राज्यातील दोघांसह पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून लाखोंच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

तळेगाव शिवारातील एका बंगल्यात बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी व पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस, ग्रामीण पोलीस आणि त्र्यंबकेश्वर पोलिसांनी सकाळी तेथे छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून १२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तेलंगणा राज्यातील अमरेश्वर आईथा, दासरी सत्यइ, तळेगाव येथील गोकुळ दाते, बंगल्याचे मालक हिरामण दाते व नाशिकच्या सातपूर येथील मच्छिंद्र घनदाट या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी एका फरार संशयिताचा शोध सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावीत यांनी दिली.

रसायनांचा वापर करून छापल्या नोटा

विशिष्ट रसायनामध्ये बुडवलेल्या चलनी नोटांचे छापे कागदावर उमटवून बनावट नोटा तयार केल्या जात असल्याचे तपासात आढळून आले. १० लाखांच्या खऱ्या चलनी नोटांच्या बदल्यात ३० लाखांच्या बनावट नोटा दिल्या जात होत्या. असाच एक व्यवहार सुरू असताना पोलीस पथकाने छापा टाकून पाच जणांना रंगेहाथ पकडले. संशयितांनी आतापर्यंत कुठे-कुठे या बनावट नोटा वितरीत केल्या आहेत, याचाही शोध घेतला जात आहे.