माणसं पळवणे, दमदाटी करणे जिल्ह्यात कधीही घडले नव्हते; सहकारातील गुन्हेगारी प्रवृत्ती वेळीच रोखा – जयंत पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संस्थांच्या ठरावासाठी काही गावांत दमदाटी, संचालकांना उचलून नेऊन ठराव करणे दुर्दैवी आहे. निवडणुकीत माणसं पळवणे, दमदाटी करणे ही प्रथा सांगली जिह्यात यापूर्वी कधीही घडली नव्हती. सहकारात गुन्हेगारी प्रवृत्तीचा होत असलेला शिरकाव वेळीच रोखला पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

सांगली जिल्हा बँकेची सर्वसाधारणसभा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, की, जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत नोव्हेंबरमध्ये समाप्त होत असून, सहकार विभागाने निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे. निवडणुकीसाठी संस्था प्रतिनिधींची नावे ठरावाच्या रूपाने मागणी झाली आहे. या ठरावात नाव समाविष्ट करण्यासाठी सहकारी संस्था संचालकांच्या पळवापळवीचे प्रकार काही ठिकाणी घडले. याचा समाचार त्यांनी यावेळी घेतला. जिह्यात यापूर्वी माणसे पळवून नेण्याची प्रथा कधीच नव्हती. खुलेपणाने निवडणुकीला सामोरे जाऊन लोकशाही मार्गाने सत्ता मिळवणे हेच आपल्या जिह्यात घडत आले आहे. मात्र, आता काही ठिकाणी माणसे पळवून दहशतीने ठराव करण्याचे प्रकार घडू लागले, तर सहकाराच्या दृष्टीने घातक ठरू शकते. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच रोखण्याची गरज आहे.