
स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ अभियानाची घोषणा केली आहे. याअंतर्गत देशभरात 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान ‘तिरंगा रॅली’ आणि विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून एका तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत सहभागी झालेल्या 40 हून अधिक विद्यार्थिनींची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीव्र उष्णता आणि उन्हामुळे या मुली आजारी पडल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या रॅलीत विविध शाळांमधील सुमारे पाच हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. रॅली मार्गक्रमण करत असताना उष्णता आणि दमट वातावरणामुळे काही विद्यार्थिनींना चक्कर येऊ लागली. शिक्षकांनी त्यांना तात्काळ पाणी देऊन सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, रॅलीचा समारोप झालेल्या स्टेडियमवर पोहोचल्यानंतर आणखी काही विद्यार्थिनींची प्रकृती खालावली आणि उष्णतेच्या त्रासामुळे काही विद्यार्थीनी बेशुद्ध पडल्या.
या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून तातडीने अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या. बाधित विद्यार्थिनींना महर्षी देवराहा बाबा स्वायत्त राज्य वैद्यकीय महाविद्यालयाच्या आपत्कालीन विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्व विद्यार्थिनींची प्रकृती सुधारत असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.




























































