
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पंजाब आणि तेलंगणा या राज्यांमध्ये सुरू असलेल्या मतदार यादी सुधारणा मोहिमेमुळे (एसआयआर) राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या पंजाबच्या प्रारुप मतदार यादीत तब्बल 20 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. तर दुसरीकडे, तेलंगणात तब्बल 73 लाख मतदारांचे फॉर्म वेळेत जमा न झाल्यामुळे पक्षाच्या स्थानिक नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी संताप व्यक्त केला.
पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकारी अनिंदिता मित्रा यांनी गुरुवारी सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली. या यादीतून एकूण 20 लाख 51 हजारांहून अधिक मतदारांची नावे हटवण्यात आली असून आहे. हे प्रमाण एकूण मतदारांच्या 9.63 टक्के इतके आहे. अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि डुप्लिकेट श्रेणींतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
कुणाची नावे वगळली
- स्थायी स्थलांतरित – 9 लाख 44 हजार 131 (4.40 टक्के)
- मृत व्यक्ती – 5 लाख 74 हजार 568 (2.68 टक्के)
- शोध न लागलेले (पत्ता नसलेले) – 4 लाख 12 हजार 715 (1.92 टक्के)
- दुबारनोंदी: 1 लाख 1 हजार 145 (0.56 टक्के)
दरम्यान, पंजाबमध्ये 25 जून ते 3 ऑगस्ट दरम्यान घरोघरी जाऊन डेटा संकलित करण्याचे काम पूर्ण झाले. एकूण 2.14 कोटी मतदारांपैकी सुमारे 1.94 कोटी (90.37 टक्के) मतदारांचे डेटा फॉर्म डिजिटल करण्यात आले आहेत. ज्यांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळली गेली असतील किंवा ज्यांना नवीन नावे समाविष्ट करायची आहेत, ते 13 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान आवश्यक कागदपत्रांसह मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.ceopunjab.gov.in) किंवा नागरिक पोर्टलवर (voters.eci.gov.in) अर्ज करू शकतात, अशी माहिती अनिंदिता मित्रा यांनी दिली.
73 लाख फॉर्म आलेच नाहीत
पंजाबमधील घडामोडींनंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आपत्कालीन बैठक घेतली. राज्यभरात सुमारे 21 टक्के मतदारांची नावे वगळली जाण्याची भीती व्यक्त करत त्यांनी पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या ढिम्म कारभारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. तेलंगणात एकूण 3 कोटी 38 लाख 26 हजार 448 मतदारांपैकी 2 कोटी 64 लाख 87 हजार 214 (78.30 टक्के) मतदारांचेच फॉर्म डिजिटलाइज झाले आहेत. तब्बल 73 लाख मतदारांचे फॉर्म जमा न झाल्यामुळे या मतदारांवर यादीतून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे. सर्व पालक मंत्र्यांनी पुढील 2 दिवसांत आपापल्या जिल्ह्यांत जाऊन विधानसभा क्षेत्रनिहाय आढावा बैठका घ्याव्यात. पक्षाच्या प्रभारी नेत्यांनी पुढील 4 दिवस स्वतःच्या विधानसभा मतदारसंघात ठाण मांडून तांत्रिक अडचणी सोडवाव्यात, असे निर्देश रेड्डी यांनी दिले. तसेच BRS आणि भाजप या विरोधी पक्षांकडून मतदार यादीतून नावे कमी करण्याचे जे राजकीय षड्यंत्र रचले जात आहे, त्याचा पर्दाफाश करण्याचे निर्देशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.



























































