
पाकिस्तान आणि आयसिसशी (ISIS) कथित संबंध असल्याच्या आरोपावरून कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात उत्तर प्रदेशातील दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशच्या ‘अँटी-टेररिस्ट स्क्वॉड’ने (ATS) ही कारवाई केली. कलबुर्गी तालुक्यातील उप्पलम गावाच्या परिसरातून या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. यूपी एटीएस त्यांची चौकशी करत आहे.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी एका बीफ कारखान्यात कामाला होते. मोहम्मद समीर आणि सलमान अशी या संशयितांची नावे असून ते मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. यूपी एटीएसला कारवाईदरम्यान आरोपींच्या खोलीतून नकाशे सापडल्याचे कळते. तपासाधीन असलेल्या कथित कारवायांशी या नकाशांचा काही संबंध आहे का, याचा शोध यंत्रणा घेत आहेत. याप्रकरणी युनिव्हर्सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे युपी एटीएसने कलबुर्गी भागात ही कारवाई केली. चौकशी आणि कारवाईदरम्यान जप्त केलेल्या पुराव्यांची पडताळणी झाल्यानंतर अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.




























































