अरुणाचल प्रदेशातील चिनी घुसखोरीच्या वृत्तावर पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी उत्तर द्यावे, मल्लिकार्जुन खरगे यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अरुणाचल प्रदेशातील काही भागांमध्ये चीनने हिंदुस्थानी सैनिकांना गस्त घालण्यापासून रोखले असल्याच्या वृत्तावरून काँग्रेसने केंद्र सरकारला घेरले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी यावर मौन सोडून देशाला सत्य सांगावे, अशी आक्रमक मागणी शुक्रवारी केली. अरुणाचल प्रदेशातील अप्पर सुबनसिरी भागात चिनी सैन्याच्या वाढत्या हालचालींच्या बातम्या समोर आल्यानंतर खरगे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

X वर पोस्ट करत मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारला जाब विचारला आहे. ‘गलवाननंतर आता अरुणाचल प्रदेश?’ असा सवाल करत ते म्हणाले की, चिनी सैन्य अरुणाचल प्रदेशातील आणखी काही भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या बातम्या अतिशय चिंताजनक आहेत. अरुणाचल हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग असून मोदी सरकारने यावर तातडीने उत्तरे देणे गरजेचे आहे. २०२० मध्ये आपल्या २० शूर जवानांनी गलवान खोऱ्यात सर्वोच्च बलिदान दिल्यानंतर स्वतः पंतप्रधान मोदींनीच चीनला क्लीन चिट दिली होती, हे देश विसरू शकत नाही आणि सरकारच्या याच भूमिकेमुळे चिनी सैन्याचे मनोधैर्य वाढल्याचा आरोपही खरगे यांनी केला.

या मुद्द्यावरून खरगे यांनी सरकारला काही गंभीर प्रश्न विचारले आहेत. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने ताकसिंगजवळ आपला वावर वाढवला आहे का आणि गस्त घालण्यासाठी निश्चित केलेल्या शेरा-५ या पॉईंटवर जाण्याचा हिंदुस्थानचा नियमित अधिकार आपण गमावला आहे का, याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या संवेदनशील भागात हिवाळ्यात हिंदुस्थानी सैन्याची गस्त मर्यादित का केली जाते आणि दुसरीकडे चिनी सैन्य वर्षभर तिथे कसे उपस्थित राहते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.