बाळाला कुशीत घेऊन मंदिराबाहेर बसलेल्या महिलेला तरुणाने चपलेने केली मारहाण, Video पाहून तुमचेही रक्त खवळेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंदिराबाहेर कडेवर लहान बाळ घेऊन बसलेल्या एका गरीब महिलेला एका व्यक्तीने अत्यंत निर्घृणपणे चपलेने मारहाण केल्याची संतापजनक घटना पंजाबमधील कपूरथला येथे घडली आहे. पवन शर्मा असे त्या आरोपीचे नाव आहे. या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

पवन शर्मा हा याचे माता भद्रकाली मंदिराजवळ एक दुकान आहे. काही मुले शर्माच्या दुचाकीशी छेडछाड करत असल्यावरून त्याच्या पत्नीचा आणि सदर महिलेचा वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून दुकानदाराने या गरीब महिलेला मारहाण केली. व्हायरल झालेल्या ३८ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये पवन शर्मा मंदिराजवळ बसलेल्या महिलेवर ओरडताना दिसत आहे. त्यानंतर तो पायातील चप्पल काढून अवघ्या ३० सेकंदांत तिच्या चेहऱ्यावर सलग ९ वेळा चपलांचे जोरदार फटके मारतो. मारहाणीदरम्यान महिला स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असताना, आरोपीने तिचा हात बाजूला सारून थेट चेहऱ्यावर वार केले. एका दुसऱ्या महिलेने मध्यस्थी करून त्या व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आसपासचे नागरिक जमा झाले आणि त्यांनी त्या व्यक्तीला जाब विचारला. तरीही संतापलेल्या आरोपीने महिलेला लाथ मारल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कपूरथलाचे पोलीस उपअधीक्षक (DSP) शीतल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार “याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पथके त्याचा कसून शोध घेत आहेत. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल.”