रिलायन्स आणि रोल्स-रॉयसची भागीदारी, हिंदुस्थानच्या AMCA स्वदेशी लढाऊ विमानासाठी बनवणार इंजिन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या स्वदेशी लढाऊ विमानांच्या विकासात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. रिलायन्स समूह आणि ब्रिटनची प्रख्यात कंपनी रोल्स-रॉयस यांनी हिंदुस्थानात अॅडव्हान्स्ड मिडीयम कॉम्बॅट एअरक्राफ्टचे (AMCA) इंजिन बनवण्यासाठी भागीदारी करण्याची घोषणा केली आहे. या महत्त्वपूर्ण कराराचा मुख्य उद्देश हिंदुस्थानात AMCA लढाऊ विमानांसाठी लागणारे प्रगत इंजिन तंत्रज्ञान विकसित करणे हा आहे, ज्यामुळे देशाला लवकरच स्वतःचे स्वदेशी लढाऊ विमान इंजिन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज तकने यासंदभात वृत्त दिले आहे.

रोल्स-रॉयस ही कंपनी तिच्या लक्झरी कारसाठी जगभरात प्रसिद्ध आहे, मात्र विमान इंजिन निर्मितीतही या ब्रिटिश कंपनीचा मोठा नावलौकिक आहे. या नव्या भागीदारीअंतर्गत, रिलायन्स आणि रोल्स-रॉयस या दोन्ही कंपन्या एकत्रितपणे AMCA इंजिनचे डिझाइन, विकास आणि उत्पादन हिंदुस्थानातच करण्यासाठी प्रयत्नशील असतील. याशिवाय हिंदुस्थानात एरोस्पेस गॅस टर्बाइन कॉम्प्लेक्स उभारण्याच्या शक्यतांवरही काम केले जाणार आहे. भविष्यात हे कॉम्प्लेक्स देशातील पॉवर आणि प्रोपल्शन तंत्रज्ञानासाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून विकसित केले जाईल.

दरम्यान, AMCA हा हिंदुस्थानचा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि नेक्स्ट जनरेशन स्वदेशी फायटर जेट प्रोग्राम आहे. हिंदुस्थानी हवाई दलासाठी अत्याधुनिक ‘स्टील्थ फायटर एअरक्राफ्ट’ तयार करणे हे या प्रकल्पाचे लक्ष्य आहे. कोणत्याही लढाऊ विमानाची खरी ताकद त्याच्या एरो-इंजिन मध्ये असते. स्वतःचे इंजिन विकसित करणे हे सध्या हिंदुस्थान पुढील सर्वात मोठे तांत्रिक आव्हान आहे.