
>> आशिष बनसोडे
भीषण अपघात, स्फोट, आगीच्या भयानक घटना, नैसर्गिक आपत्ती अशा गंभीर घटनांमध्ये झालेल्या भयंकर मृत्यूनंतर मृतांची ओळख पटविणेदेखील अशक्य होऊन जाते. याचवेळी न्यायवैद्यक शास्त्र विभागाची खरी कसोटी लागते.
नैसर्गिक आपत्ती किंवा अपघाताच्या घटना कधी, कशा घडतील याचा काही नेम नसतो. बऱ्याचदा अशा भयंकर दुर्घटना घडतात की, त्यात अनेकांना प्राणास मुकावे लागते. इतक्या निर्दयीपणे मृत्यू ओढवतो की, त्यात मृतांची ओळख पटवणेदेखील कठीण होऊन जाते. अशा वेळी न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे अधिकारी, कर्मचारी यांचा कस लागतो. गेल्या काही घटनांमध्ये या विभागाने छिन्नविछिन्न झालेल्या मृतदेहांची अवघ्या काही तासांमध्ये ओळख पटवून त्यांना न्याय देण्याचे भरीव काम केले आहे.
राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गांवर अपघात होणे, कारखान्यांमध्ये आगडोंब उसळणे, भीषण स्फोट होणे, नैसर्गिक आपत्ती ओढवणे या आणि अशा स्वरूपाच्या घटना अधेमधे घडतच असतात. त्यातील मृतांची ओळख पटविणे अशक्य होऊन जाते. याचवेळी न्यायवैद्यक शास्त्र विभागाची कसोटी लागते.
मृत व्यक्तींचे आवश्यक नमुने घेऊन मग त्यांच्या नातेवाईकांशी मृतकांचे डीएनए जुळतात का ते तपासून मग मृतांची ओळख पटविण्याचे काम करावे लागते. तसे पाहता मृतांची संख्या जास्त असेल तर डीएनए तपासून ओळख पटविणे वेळखाऊ ठरते; परंतु न्यायवैद्यक शास्त्र विभागाच्या पथकांनी गेल्या काही घटनांमध्ये 24ƒ7 अहोरात्र काम करून अवघ्या काही तासांमध्ये मृतांची ओळख पटवून देण्याचे अचूक काम केले आहे. परिणामी मृतदेहांवर वेळीच व नातेवाईंकाकरवी अंत्यसंस्कार करण्यात आले, शिवाय संबंधितांच्या नातेवाईकांना शासनाकडून मदत मिळण्यास मदत झाली. या विभागाचे प्रभारी संचालक डॉ. विजय ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विभाग काम करीत आहे.
गेल्या वर्षभरातील काही घटना पाहिल्या असता या विभागाच्या कामाची गती आणि तत्परता याचा अंदाज येतो. जुलै 2023 रोजी बुलडाण्याच्या पिंपळखुटा येथे समृद्धी महामार्गावर बस अपघात झाला होता. हा अपघात इतका भंयकर होता की, प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यावेळी डीएनए चाचणी करण्याकरिता 25 मृतक व त्यांचे नातेवाईक यांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. डॉ. विजय ठाकरे तसेच नागपूर येथील सहाय्यक संचालक वैशाली महाजन, सरावी नेहा भाले, वैज्ञानिक सहाय्यक अपूर्व शिंदे यांच्यासह अमरावती प्रयोगशाळेतील सहाय्यक संचालक शर्वरी कुळकर्णी, दुबला, सरावी, कावेरी गोरडे, गुणवंत देशमुख, चंद्रकांत हडबे, शारदा उबाळे, अभिषेक ताडे, वैज्ञानिक सहाय्यक प्रियांका कहने, अनुराग वंजारे यांनी दिवसरात्र एक करून 74 तासांत मृतांची ओळख पटविण्याचे काम केले होते. त्यावेळी ओळखही पटणार नाही अशा परिस्थितीत असलेल्या मृतांची ओळख पटविण्याचे काम या संस्थेच्या डीएनए विभागाने अचूक व विक्रमी वेळेत करून दाखवले.
नागपूरच्या कोंडाजी येथील सोलार इंडस्ट्रियल लिमिटेड या कंपनीत भीषण स्फोट झाला होता. त्यात नऊ कर्मचाऱयांचा मृत्यू झाला होता. त्यांची ओळख पटविणेदेखील अशक्य बाब बनली होती. अशा परिस्थितीतदेखील या विभागाने अचूक कामगिरी करत अवघ्या 48 तासांत मृतक व नातेवाईकांचे डीएनए तपासून मृतांची ओळख पटविण्यात आली. या आणि अशा अनेक घटना, दुर्घटना मागच्या काही वर्षांत घडल्या. आपल्या या कामगिरीबाबत ते समाधानीदेखील आहेत. वरिष्ठांकडून वेळोवेळी कौतुकाची थाप मिळत असल्याने अधिकारी, कर्मचाऱयांना आणखी जोमाने काम करण्याचे बळ मिळत आहे. पण शासनाकडून म्हणावी तशी या कामांची दखल घेतली जात नसल्याची खंतदेखील आहे.
पोलीस दल किंवा अन्य विभागांनी चांगली कामगिरी केल्यावर शासनाकडून शाबासकीची थाप त्यांना मिळते; पण न्यायवैद्यक शास्त्र विभाग मात्र यापासून पोरका असल्याचे चित्र आहे. शासनाने जर पाठीवर वेळोवेळी थाप दिली तर आम्हाला नक्कीच प्रोत्साहन मिळेल आणि आणखी जोमाने काम करण्याची एनर्जी मिळेल अशीच काहीशी भावना या विभागातील अधिकारी, कर्मचाऱयांची आहे. दरम्यान, काहीही असले तरी महाराष्ट्राच्या न्यायवैद्यक शास्त्र प्रयोगशाळेचा डीएनए विभाग आपल्या लौकिकेला साजेसे असेच काम करत असून अपघातात, दुर्घटनेत मृत पावणाऱयांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहे.




























































