परीक्षण – ग्रामीण संस्कृतीचा डोळस वेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> श्रीकांत आंब्रे

मराठवाड्यातील सध्याच्या कसदार कथालेखकांमध्ये ज्यांची आवर्जून गणना करता येईल असे कथाकार हंसराज जाधव यांचा ‘मोहरम’ हा पहिलाच कथासंग्रह अलीकडेच प्रकाशित झाला असला तरी ते फार पूर्वीपासून कथालेखन करीत आहेत. ग्रामीण पार्श्वभूमीवरील त्यांच्या या कथासंग्रहातून त्यांना असलेली कथा या वाङ्मयप्रकाराची नेटकी जाण तर दिसतेच, पण ज्या मातीत ते वाढले त्या मातीशी असलेलं त्यांचं जिवाभावाचं नातंही प्रत्ययास येतं. अवतीभवतीच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक आणि शेतकरी जीवनाशी समरस झालेला हा लेखक आहे. पंचक्रोशीतील रूढी, परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा डोळसपणे न्याहाळताना आणि त्यातील ‘थ्रील’ अनुभवताना त्यांच्या वर्णनशैलीत कमालीचं चैतन्य येतं. या सर्व कथांमधून लेखक त्याच्या अंगभूत गुणांसह दिसतो. तो पंचक्रोशीतील ग्रामीण वातावरणात जसा रमतो, तसाच आजूबाजूच्या सर्व क्षेत्रात चाललेली लुच्चेगिरी पाहून खंतावतो. त्याला सलणारी ही बोच आक्रस्ताळेपणाने नव्हे, तर कधी कर्म विनोदाचा शिडकावा करीत तर कधी उपाहासात्मक पद्धतीने कथांमधील व्यक्तिरेखांच्या स्वभावविशेषातून, बोलण्यातून, वागण्यातून व्यक्त होते. मोठ्या पदांवरील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या महाभागांची भंपकगिरी, ढोंगबाजी याचं बोलकं चित्र तो वाचकांपुढे ठेवतो.

एकूण आठ कथा या संग्रहात आहेत. त्यापैकी दोन-तीन दीर्घ कथा आहेत. खरं तर या आत्मकथनात्मक कथा आहेत. जे स्वतः अनुभवलं ते मांडण्यासाठी त्यांनी कथा या फॉर्मचा आधार घेतला आहे, हे जाणवतं. वेगवेगळ्या आशयाच्या या कथांमधून लेखकाचं अनुभवविश्व किती समृद्ध आहे याचं प्रत्यंतर येतं. शैक्षणिक विश्वातील भ्रष्टाचार, सुशिक्षित बेरोजगारांची समस्या, ग्रामीण भागातील सांस्कृतिक बहुविधता, कौटुंबिक नात्यांमधील घालमेल, श्रद्धा-अंधश्रद्धेच्या पगड्यात भोळ्याभाबड्या माणसांना गुरफटून ठेवून स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या वल्ली इथे दिसतात. ‘संकल्प’ ही कथा त्या दृष्टीने पाहण्यासारखी आहे.

‘घंटेवारी’ या कथेतील भंपक प्राध्यापक असोत वा खालावलेल्या शिक्षणपद्धतीचे प्रतीक असलेले ‘सरप्लस’ कथेतील प्राचार्य असोत, अशा या व्यक्तिरेखा समाजात कुठेही दिसू शकतात. शेतकरी चळवळीतील संघटनेचा बोलबाला असतानाही तिचे कार्यकर्ते कशामुळे अस्वस्थ असतात हे ‘बिल्लेवाला’ या कथेत खुबीने मांडले आहे. एकीकडे उच्च-नीच लेबल असलेल्या जातीभेदांनी समाजाला पोखरलं असलं तरी दुसरीकडे अशा परिस्थितीतही एकमेकांच्या धर्मसंस्कृतीत विरघळून गेलेली दोन धर्मांतील माणसं ‘मोहरम’ या कथेत दिसतात. लेखक ग्रामीण संस्कृतीचे साहसी पैलू जसे उलगडून दाखवतो तसेच मायेचे संस्कारही. लेखकाची जीवनाकडे खेळकरपणे पाहण्याची विनोदी, मिश्कील वृत्ती ‘चौताई’ या धमाल विनोदी कथेत तशीच कोरोना काळातील एका लग्नाच्या ‘मुंगसं आणि मुंडावळ्या’ या कथेतही दिसते.

नेमक्या संवादातून या कथा फुलत जातात. साधी, सोपी भाषा आणि आशयानुसार तिचं पालटणारं रूप कथांना ताकद देतं. व्यक्तिरेखांचे नेमके स्वभावविशेष आणि लकबी त्यांना अधिक उठावदार बनवतात.

‘मोहरम’ या कथेत तेथील ग्रामीण बोलीचा पूर्ण पगडा आहे. इतर काही कथांमध्येही या बोलीतील शब्द दिसतात. शहरी वाचकांना त्या शब्दांचे नेमके अर्थ समजणं कदाचित कठीण जाईल. पुढच्या आवृत्तीत अशा शब्दांच्या अर्थाचे परिशिष्ट समाविष्ट करणे अधिक उपयुक्त होईल. लेखकाची कथा विषयाची जाण प्रगल्भ आहे. त्यामुळे भविष्यात त्यांच्याकडून उत्तमोत्तम कथा वाचायला मिळतील, ही अपेक्षा वाचकांनी ठेवली तर त्यात नवल नाही. सरदार जाधव यांचे मुखपृष्ठही बोलकं आहे.

मोहरम

लेखक : हंसराज जाधव

प्रकाशक : लोकवाङ्मय गृह, प्रभादेवी

पृष्ठे : 184

मूल्य : रुपये 250/-