
>> डॉ. समिरा गुजर-जोशी
तुल्यवर्णच्छद कृष्ण कोकिलैः सह संगत।
केन विज्ञायते काक स्वयं यदि न भाषते।।
काळ्या रंगाच्या, कोकिळेसारख्याच पिसांचा कावळा जर कोकिळांच्या समूहात मिसळून बसला आणि स्वत: बोललाच नाही, तर तो कावळा आहे हे कोणाला आणि कशावरून ओळखता येईल?
कावळा आणि कोकिळा दोघेही काळे. त्यामुळे केवळ बाह्य रूप पाहून त्यांच्यातील फरक सहज लक्षात येत नाही. पण दोघांनी तोंड उघडले की त्यांची खरी ओळख होते. कोकिळेचे मधुर कूजन आणि कावळ्याचा कर्कश स्वर त्यांच्यातील भेद स्पष्ट करतो. यातील ‘स्वयम यदि न भाषते’ हे शब्द विशेष मार्मिक आहेत. माणूस जोपर्यंत बोलत नाही, तोपर्यंत त्याचे अंतरंग पूर्णपणे उघड होत नाही. रूप माणसाची बाह्य ओळख सांगते; वाणी त्याची खरी ओळख करून देते.



























































