
घाटकोपर, कामराज नगर येथील प्रस्तावित एसआरए प्रकल्पासाठी 35 झाडे कापण्यात येणार आहेत, तर 11 झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. जी झाडे कापण्यात येणार आहेत त्या बदल्यात 15 दिवसांत 955 नवीन झाडे रिक्रिएशन ग्राऊंडवर लावली जाणार आहेत. मात्र नेमकी कोणती झाडे लावण्यात येणार आहेत, याची सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. याबद्दल वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत शिवसेनेने आक्षेप घेतला.
घाटकोपर पूर्व येथे रमाबाई आणि कामराज नगर एसआरए प्रोजेक्टचे काम होणार आहे. या कामात अडथळा निर्माण करणारी झाडे तोडण्यासाठी मंजुरी मिळावी, याबाबतचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत आला. 35 झाडांच्या बदल्यात जी 955 झाडे लावण्यात येणार आहेत त्याचे जतन-संवर्धन एमएमआरडीएमार्फत केले जाणार आहे. ही झाडे 3817 चौरस मीटर जागेवर लावली जाणार आहेत. मात्र नियमानुसार 100 चौरस मीटर जागेत पाच झाडे लागली पाहिजेत. त्या हिशेबाने 3817 चौरस मीटर जागेत फक्त 191 झाडे लागू शकतात.
पिंपळ, बदाम, वड, नारळ, गुलमोहर, अशोक अशा झाडांच्या बदल्यात सुपाऱ्यांची, पामची झाडे लावली जाणार आहेत. यामुळे पर्यावरणाचे असंतुलन होऊ शकते, हा मुद्दा महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर आणि नगरसेवक प्रमोद सावंत यांनी उपस्थित केला. यावरील चर्चेला उत्तर देताना आयुक्त अश्विनी भिडे यांनी कोणती झाडे लावण्यात येतील, त्याचा तक्ता करण्याचे निर्देश दिले.


























































