मी भ्रष्टाचारी नाही! पश्चिम बंगालचे माजी उपसभापती आशिष बॅनर्जी यांनी मृत्यूला कवटाळले, पक्ष कार्यालयात आढळला मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगाल विधानसभेचे माजी उपसभापती आणि तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आशिष बॅनर्जी यांचा मृतदेह बीरभूम जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यालयात संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामपुरहाट येथील हट्टालापाडा परिसरात आशिष बॅनर्जी यांच्या घराजवळच तृणमूल काँग्रेसचे कार्यालय आहे. या कार्यालयातच त्यांचा मृतदेह आढळून आला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. बॅनर्जी यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि पोलिसांचा प्राथमिक तपास पूर्ण झाल्यानंतरच त्यांच्या मृत्यूमागील वास्तविक कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

आशिष बॅनर्जी हे पश्चिम बंगालच्या राजकारणातील बडे नेतृत्व मानले जात होते. रामपुरहाट विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सलग पाच वेळा आमदार म्हणून विजय मिळवला होता. 2021 ते 2026 या कालावधीत त्यांनी पश्चिम बंगाल विधानसभेचे उपसभापती म्हणून जबाबदारी सांभाळली होती. याशिवाय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी कृषी खात्यासह अनेक महत्त्वाच्या विभागांचे मंत्री म्हणून काम पाहिले होते. 2017 ते 2021 दरम्यान ते राज्याचे कृषी मंत्री होते.