
तुम्ही जर घरगुती एलपीजी सिलिंडरचे ग्राहक असाल आणि अद्याप आधार आधारित ई-केवायसी पूर्ण केली नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ई-केवायसी करण्याची आज तुमच्याकडे शेवटची संधी आहे. तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 ऑगस्ट 2026 ही ई-केवायसी पूर्ण करण्याची शेवटची तारीख आहे.
रविवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत बायोमेट्रिक पडताळणी न करणाऱ्या ग्राहकांना अनुदानित (सबसिडी) दरात मिळणाऱ्या सिलिंडरपासून वंचित राहावे लागू शकते. इतकेच नव्हे तर ई-केवायसी न केल्यास नवीन सिलिंडरची बुकिंग रोखली जाऊ शकते आणि उज्ज्वला योजनेतील ग्राहकांची थेट सबसिडी बंद होण्याचा मोठा फटका बसू शकतो. हा नियम जुन्या आणि नवीन अशा दोन्ही प्रकारच्या ग्राहकांना लागू करण्यात आला आहे.
ई-केवायसी न केल्यास खिशावर किती भार पडणार?
ई-केवायसी न झाल्यास ग्राहकाचे कनेक्शन कायमचे रद्द होणार नाही; मात्र पडताळणी पूर्ण होईपर्यंत ग्राहकांना घरगुती दरांऐवजी व्यावसायिक दराने सिलिंडर खरेदी करावा लागू शकतो. उदाहरणार्थ, मुंबईमध्ये 14.2 किलोंच्या घरगुती सिलिंडरची किंमत सुमारे 941.50 रुपये आहे, तर 19 किलोंच्या व्यावसायिक सिलिंडरचा दर 2,691 रुपये आहे. ई-केवायसी चुकल्यास ग्राहकांना एका सिलिंडरमागे 1,700 रुपयांपेक्षा जास्त अतिरिक्त खर्च सोसावा लागू शकतो.
ई-केवायसी का अनिवार्य करण्यात आले?
- पारदर्शकता आणि गैरवापर रोखणे – बनावट किंवा अवैध कनेक्शन शोधून खऱ्या आणि पात्र ग्राहकांपर्यंतच सबसिडीचा लाभ पोहोचवणे.
- काळाबाजारला आळा – घरगुती सिलिंडरचा बेकायदेशीरपणे व्यावसायिक कामांसाठी होणारा वापर व काळाबाजार पूर्णपणे थांबवणे.
घरबसल्या 5 मिनिटांत करा e-KYC
तुम्ही गॅस एजन्सीत न जाता मोबाईलवरूनही ई-केवायसी पूर्ण करू शकता. तुमच्या गॅस कंपनीचे (Indane, HP Gas किंवा Bharat Gas) अधिकृत ॲप Google Play Store वरून डाऊनलोड करा. ॲपमध्ये लॉगीन करून e-KYC पर्यायावर क्लिक करा. दिलेल्या सूचनांनुसार चेहरा स्कॅन करा. स्कॅन करताना चेहऱ्यावर पुरेसा प्रकाश असावा आणि मोबाईल स्थिर ठेवावा. केवळ चेहरा स्कॅन झाल्याने प्रक्रिया पूर्ण होत नाही. ॲपवर ‘e-KYC Success’ असा मेसेज दिसणे आवश्यक आहे.


























































