
महाराष्ट्रामध्ये अन्न व औषध विभागाची धडक कारवाई सुरू असतानाच शेजारील राज्य कर्नाटकमध्येही अशीच मोहीम सुरू करण्यात आली आहे. कर्नाटकात राबवण्यात येत असलेल्या विशेष अन्न सुरक्षा तपासणी मोहिमेदरम्यान विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, रिसॉर्ट्स आणि सार्वजनिक अन्न पुरवठा केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छता व अन्नाच्या गुणवत्तेबाबत गंभीर उल्लंघन उघडकीस आले आहे. प्रशासनाने कारवाई करत मोठ्या प्रमाणावर कालबाह्य आणि असुरक्षित अन्नपदार्थ जप्त केले असून अनेक नामांकित आस्थापनांना नोटिसा बजावल्या आहेत.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी म्हैसूर शहर आणि जिल्ह्यात शनिवारी अचानक तपासणी सत्र राबवले. या कारवाईदरम्यान ‘रिओ मेरिडियन’ हॉटेलमधून 9 किलो कालबाह्य झालेले चिकन जप्त करण्यात आले. तसेच इतर हॉटेल्सच्या तपासणीत ‘ग्रँड मर्क्युरी’ हॉटेलमधून तब्बल 68 किलो शिळे व सडलेले मांस आणि ‘क्यू स्टार’ हॉटेलमधून 4 किलो बुरशीयुक्त मशरूम जप्त करण्यात आले. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
रिसॉर्ट्स आणि शासकीय कॅन्टीनही रडारवर
म्हैसूर आणि नंजनागूड तालुक्यांतील तीन रिसॉर्ट्सची तपासणी करून त्यांना कारणे दाखवा नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. या मोहिमेत एकूण 16 किलो कालबाह्य अन्नपदार्थ घटनास्थळीच नष्ट करण्यात आले, तर रासायनिक पृथक्करणासाठी 5 अन्न नमुने गोळा करण्यात आले आहेत. दुसरीकडे, मंगळुरू येथील के. एस. राव रोडवरील ‘सिटी सेंटर’मधील केएफसी आउटलेटवर ग्राहकाच्या तक्रारीनंतर अन्न सुरक्षा पथकाने धाड टाकली. ऑनलाइन मागवलेला चिकन पेरी पेरी लेग शिळा आणि दुर्गंधीयुक्त असल्याची तक्रार ग्राहकाने केली होती. यानंतर अधिकाऱ्यांनी केएफसीच्या स्वयंपाकघर, शीतगृह, फ्रीझर आणि तयार अन्नाच्या साठ्याची सखोल पाहणी केली.
राज्यभरात 1000 किलोपेक्षा जास्त अन्न जप्त
कर्नाटक अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाकडून सुरू असलेल्या या व्यापक मोहिमेत आतापर्यंत 1000 किलोपेक्षा जास्त असुरक्षित आणि दूषित अन्नपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. बेंगळुरू, म्हैसूर आणि मंगळुरू येथील 3 स्टार आणि 5 स्टार हॉटेल्समध्ये कालबाह्य साहित्य, कुजलेल्या भाज्या, बुरशीयुक्त पदार्थ आणि मांसाची अयोग्य साठवणूक आढळून आली आहे. तसेच बंगळुरूमधील ‘विधान सौध’, ‘विकास सौध’ आणि ‘आरोग्य सौध’ या महत्त्वाच्या सरकारी संकुलांमधील खानावळींमध्येही अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन आढळले आहे. याशिवाय क्विक-कॉमर्स डार्क स्टोअर्स आणि ‘इंदिरा कॅन्टीन’वरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

























































