Hockey World Cup 2026 – आज हिंदुस्थानची अग्निपरीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेल्सला 3-1 ने नमवत दमदार सुरुवात करणारा हिंदुस्थान सोमवारी पुरुष हॉकी वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज असलेल्या हरमनप्रीत सिंहच्या संघाला इंग्लंडचे कडवे आव्हान पेलावे लागणार आहे.

वेल्सविरुद्ध हिंदुस्थानचे तिन्ही गोल पेनल्टी कॉर्नरवर झाले. हरमनप्रीतने दोन, तर संजयने एक गोल केला, मात्र अनेक संधी निर्माण करूनही हिंदुस्थानला ओपन प्लेमधून गोल करता आला नाही. इंग्लंडविरुद्ध ही उणीव भरून काढणे निर्णायक ठरणार आहे.दुसरीकडे इंग्लंडने पाकिस्तानचा 4-1 असा धुव्वा उडवत आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे पूल ‘डी’मधील हे थेट वर्चस्वाचे युद्ध मानले जात आहे.

पॅरिस ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत हिंदुस्थानने इंग्लंडला पराभूत केले होते, मात्र हार्दिक सिंहने इंग्लंडला अजिबात हलक्यात न घेण्याचा इशारा दिला आहे. अलीकडील प्रो लीगमध्ये दोन्ही संघांतील सामने शूटआऊटपर्यंत रंगले होते. मुख्य प्रशिक्षक व्रेग फुल्टन यांनीही इंग्लंडला पूलमधील सर्वोच्च क्रमांकाचा आणि सर्वात मजबूत संघ संबोधले आहे. त्यामुळे हिंदुस्थानला बचाव भक्कम ठेवण्यासोबत सर्कलमध्ये अधिक आक्रमक आणि अचूक फिनिशिंग करावी लागणार आहे.