
केवळ एक झूम कॉल मीटिंग बोलावून एका झटक्यात ९०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणाऱ्या हिंदुस्थानी वंशाचे सीईओ विशाल गर्ग यांच्यावर नोकरी गमवण्याची नामुष्की ओढवली आहे. बेटर होम अँड फायनान्स या कंपनीच्या संचालक मंडळाने गर्ग यांची सीईओ पदावरून उचलबांगडी केली असून डॅनियल लुईस यांच्याकडे कंपनीची धुरा सोपवली आहे.
संचालक मंडळात नुकताच समावेश झालेल्या डॅनियल लुईस यांनीच आपला विश्वासघात करून आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवल्याचा आरोप विशाल गर्ग यांनी केला आहे. अवघ्या आठवडाभरापूर्वी संचालक मंडळात आलेल्या व्यक्तीने इतर संचालकांना आपल्या बाजूने वळवत हा कट रचल्याचा दावा विशाल गर्ग यांनी केला.
विशाल गर्ग म्हणाले, डॅनियलने माझी दिशाभूल केली. त्याने सुरुवातीला कंपनीच्या रणनीतीचे कौतुक केले. सोशल मीडियावर आमची पाठराखण केली आणि त्या माध्यमातून संचालक मंडळात जागा मिळवली. त्यानंतर त्याने थेट माझ्याच पाठीत खंजीर खुपसला, असे गर्ग म्हणाले.
दरम्यान, गर्ग यांनी कंपनीच्या या निर्णयाविरोधात प्रसिद्ध वकील अॅलेक्स स्पिरो यांची नियुक्ती करत कायदेशीर लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. मला संचालक मंडळाने पुन्हा कामावर घ्यावे, अशी विनंती मी करत आहे. जोपर्यंत कंपनी पुन्हा नफ्यात येत नाही तोवर वार्षिक अवघ्या एक डॉलर इतक्या मानधनावर काम करण्यास तयार आहे, असेही गर्ग म्हणाले.


























































