
बदलते हवामान, उन्हाचा संपर्क आणि कोरडेपणामुळे ओठ कोरडे होऊन फुटण्याची समस्या अनेकांना जाणवते. ओठांची योग्य काळजी घेण्यासाठी बाजारातील लिप बामसोबत घरगुती पर्यायांचाही वापर केला जातो. देशी तुपापासून घरच्या घरी लिप बाम तयार करता येतो. हा लिप बाम तयार करण्यासाठी 4 चमचे देशी तूप, 2 चमचे नारळाचे तेल आणि 1 चमचा मध आवश्यक आहे. इच्छेनुसार पुदिना किंवा लॅव्हेंडर एसेंशियल ऑइलचे काही थेंबही घालता येतात.
सर्वप्रथम एका छोट्या भांड्यात तूप आणि नारळाचे तेल घेऊन मंद आचेवर हलके गरम करावे. दोन्ही घटक वितळल्यानंतर मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे. त्यानंतर त्यात मध घालून व्यवस्थित मिसळावे. इच्छेनुसार एसेंशियल ऑइलचे काही थेंब घालता येतील.
तयार मिश्रण स्वच्छ आणि कोरड्या छोट्या डब्यात किंवा लिप बामच्या कंटेनरमध्ये भरावे. त्यानंतर काही तास फ्रिजमध्ये ठेवावे. मिश्रण घट्ट झाल्यानंतर नैसर्गिक लिप बाम वापरता येतो.
हा लिप बाम वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे योग्य आहे. तो स्वच्छ आणि कोरड्या कंटेनरमध्ये ठेवावा. थंड आणि कोरड्या ठिकाणी किंवा फ्रिजमध्ये साठवणे चांगले. वापरल्यानंतर ओठांवर खाज, जळजळ, सूज किंवा कोणत्याही प्रकारची अॅलर्जी जाणवल्यास त्याचा वापर त्वरित बंद करावा.

























































