
जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे दहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका 25 वर्षीय तरुणाला अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे हा तरुण मुलीचा शोध घेण्यात पोलिसांची मदत करत असल्याचे भासवत त्यांच्यासोबत फिरत होता असे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांना त्याचा संशय आल्यावर त्याला ताब्यात घेतले तेव्हा हा भयंकर प्रकार उघकीस आला. या घटनेने जुन्नर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
पीडित मुलगी मंगळवारी आजारी असल्याने शाळेत गेली नव्हती. दुपारच्या वेळेस ती घरात एकटी असताना सदर तरुण तिच्या घरात घुसला व तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने मुलीची हत्या करून तिचा मृतदेह ‘लेंडे स्थळ’ परिसरातील एका ओढ्याजवळ फेकला.
मुलीचे कुटुंबीय संध्याकाळी घऱी आले तेव्हा त्यांना मुलगी घरात दिसली नाही. त्यांनी गावात शोधाशोध केली. मात्र ती कुठेच न सापडल्याने अखेर रात्री कुटुंबीयांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर मुलीचा शोध सुरू असताना आरोपी हा ग्रामस्थ व पोलिसांसोबत फिरत होता. त्याच्या वर्तनाबाबत पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशी दरम्यान त्या तरुणाने आपला गुन्हा कबूल केला.
संपूर्ण परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करूनआरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.




























































