
हिंदुस्थानातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी जम्मू-कश्मीर दौऱ्यादरम्यान एक अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. “जम्मू आणि कश्मीर हा हिंदुस्थानचा एक अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग आहे,” असे गोर यांनी जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी झालेल्या भेटीनंतर स्पष्ट केले. अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची भेट घेऊन विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. या भेटीदरम्यान दोन्ही बाजूंमध्ये प्रादेशिक विकास, सहकार्य आणि स्थानिक परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. आज तकने यासंदभात वृत्त दिले आहे.
भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजदूत गोर यांनी जम्मू-कश्मीरच्या हिंदुस्थानसोबतच्या एकात्मतेवर भर देत, हा प्रदेश हिंदुस्थानचा अविभाज्य घटक असल्याचे पुन्हा अधोरेखित केले. या चर्चेत जम्मू-कश्मीरमधील शांतता, स्थैर्य, पर्यटनाचा विकास आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यावरही सकारात्मक संवाद झाला.
दरम्यान, अमेरिकन राजदूतांच्या या स्पष्ट आणि ठाम विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदुस्थानच्या भूमिकेला मोठे नैतिक पाठबळ मिळाले असल्याचे मानले जात आहे.



























































