
जुना राग मनात धरून मौजे लादगा शिवारात करण्यात आलेल्या खुनाच्या गंभीर घटनेने परिसर हादरला. मात्र, गुन्हा करून पसार झालेल्या आरोपींच्या पाच तासात मुसक्या आवळण्यात नांदेड पोलिसांना यश आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशन राजकुमार जोगदंड (२२, रा. दापका राजा)याच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा राग मनात धरून २० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजता लादगा शिवारातील शेतात किशन जोगदंड याने साथीदारांसह संगनमत करून तक्रारदारचे वडील बाबू पुंडलिक गायकवाड (६०) यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
एवढ्यावरच आरोपी थांबले नाहीत.त्यांनी तक्रारदाराच्या आईवरही चाकूने हल्ला करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना गंभीर स्वरूपाची असल्याने नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी आरोपींचा तातडीने शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि मुखेड पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींच्या हालचालींचा माग काढला. विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत पोलिसांनी अवघ्या पाच तासांत तिन्ही मुख्य आरोपींना ताब्यात घेतले. आरोपी किशन राजकुमार जोगदंड, सोहम सुंदरसिंह बयास ऊर्फ सोन्या, मंगेश निवृत्ती लिंगे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर आणि परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी वैभव पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सहपोलीस निरीक्षक विठ्ठल घोगरे, सहपोलीस निरीक्षक गोविंद खैरे, पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे, पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार तसेच मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चितांबर कामठे, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांनी ही कारवाई यशस्वी केली.



























































