
मुंबईतील मोकळे भूखंड लाटण्याचे सत्रच भाजपने सुरू केले आहे. अंधेरी पश्चिम येथील छत्रपती शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलचे मैदान आणि जुहूतील दोन भूखंड भाजप आमदारांच्या घशात घालण्याचा महायुती सरकारचा डाव आहे, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. मोकळी मैदाने वाचवण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार असून येत्या रविवारी वांद्र्यात तिरंगा आंदोलन केले जाईल, अशी घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली. आदित्य ठाकरे यांनी आपल्या अधिकृत एक्स हॅण्डल वर आज एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये मोकळ्या जागा भाजप आमदारांच्या घशात घालणाऱ्या भाजपला रेड कार्ड असे म्हटले आहे. तसेच सर्व मुंबईकरांना तिरंगा आंदोलनासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत मुंबईतील मोकळ्या जागांच्या लूटीविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले. या आंदोलनात कोणत्याही पक्षाचे झेंडे नसतील, केवळ तिरंगा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. “मुंबईतील मोकळ्या जागांचे रक्षण करण्यासाठी सर्व भेद विसरून एकत्र या,” असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
मुंबईतील जमिनींच्या लुटीविरोधात भाजपला ‘रेड कार्ड’ दाखवण्याचे आवाहनही त्यांनी केले. राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या कारभाराविरोधात नागरिकांनी एकत्रितपणे आवाज उठवावा, असे त्यांनी म्हटले.
हे आंदोलन रविवार, 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता वांद्रे पश्चिम येथील नेव्हिल डिसोझा फुटबॉल टर्फ येथे आयोजित करण्यात आले आहे. मुंबईतील मोकळ्या जागा, मैदाने आणि क्रीडा सुविधांचे संरक्षण करण्यासाठी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
Join us against the State regime and the @mybmc snatching away open spaces, sports complexes, playgrounds to hand it over to their favoured builders and contractors.
No party flags, only our 🇮🇳
And red cards for the land loot of Mumbai at the hands of the BJP.
Let’s come… pic.twitter.com/ipgnKYE4ut
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 21, 2026



























































