‘चाणक्य नीती’च्या नावाखाली असा रडीचा डाव खेळणं भाजपच्या नेत्यांना शोभतं का? रोहित पवारांचा संतप्त सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पुण्यात येत आहेत. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राहुल गांधी तरुणाईशी थेट संवाद साधणार आहेत. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाच्या आधीच पुण्यात सीओईपी महाविद्यालयात काँग्रेस आणि एबीव्हीपीचे कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले. यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काही जणांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. राहुल गांधी यांचा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. ‘चाणक्य नीती’च्या नावाखाली असा रडीचा डाव खेळणं भाजपच्या नेत्यांना शोभत का? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवार यांनी शनिवारी सकाळी एक्सवर एक पोस्ट करत भाजपवर हल्ला चढवला. भाजपने राहुल गांधी यांचा चांगलाच धसका घेतल्याचं दिसतंय… ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमासाठी ते पुण्यात येण्यापूर्वीच भाजपच्या गुंडांनी विद्यार्थीनींना कोंडून ठेवणं, धमकावणं असले धंदे सुरू केले असून सर्वप्रथम त्याचा तीव्र निषेध, असे रोहित पवार म्हणाले.

विद्यार्थी आणि NSUI च्या कार्यकर्त्यांनी या गुंडांचा योग्य ‘पाहुणचार’ करून त्यांची पाठवणी केली, पण तरीही काही गुंड कार्यक्रमात घुसवून ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा असा कट शिजत असेल तर ज्या केंद्र सरकारला विद्यार्थ्यांनी गुडघ्यावर आणलं तिथं या गुंडांचा ‘बंदोबस्त’ करणं विद्यार्थ्यांसाठी कठीण नाही.. ‘चाणक्य नीती’च्या नावाखाली असा रडीचा डाव खेळणं भाजपच्या नेत्यांना शोभत का? असा सवाल रोहित पवार यांनी केली.

मोदी-शहा राहुल गांधींना घाबरलेले आहेत, पुण्यातील कार्यक्रम उधळण्याची भाषा म्हणजे दहशतवाद; संजय राऊत यांचा घणाघात

दिल्लीत पोलिसांसोबतच भाजपच्या गुंडांनीही विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याची सर्वत्र चर्चा आहे, तसा प्रकार महाराष्ट्रातही करण्याचा प्रयत्न केला तर हे त्यांच्याच अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. एकतर अशा गुंडांच्या घुसखोरीला पुणे पोलिस आळा घालतील, अशी अपेक्षा आहे, पण तरीही कुणी अतिधाडस दाखवण्याचा प्रयत्न केलाच तर इथले विद्यार्थीच त्यांची ‘यथासांग पूजा’ करतील, यात शंका नाही, असेही रोहित पवार म्हणाले.