
श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान ट्रस्टने मंदिर परिसर आणि गुंफा भागात सुरक्षेच्या कारणास्तव ड्रोन कॅमेरे उडवण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. देवस्थान ट्रस्टने निर्णय घेतला आहे. मंदिर आणि गुंफा परिसरात ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून शूटिंग केल्यास संबंधितांवर प्रशासनाच्या वतीने थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
श्री क्षेत्र मार्लेश्वर हे निसर्गरम्य परिसर आणि गुंफा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी येथे मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक येत असतात. वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे आणि सुरक्षेचा विचार करून देवस्थानने हा निर्णय घेतला आहे. गुंफा मंदिर हे अरुंद असून, तेथे ड्रोन उडवल्यास अपघात होण्याची शक्यता असते. तसेच, ड्रोनच्या आवाजामुळे गुंफेतील शांतता भंग होऊ शकते, ज्यामुळे धार्मिक विधींमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. काही वेळा गुंफेतील मधमाश्या ड्रोनच्या आवाजामुळे बिथरून पर्यटकांवर हल्ला करू शकतात, अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत.
देवस्थानने घेतलेला हा निर्णय भाविक आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे. पर्यटकांनी निसर्गाचा आणि तीर्थक्षेत्राचा आनंद घेताना सुरक्षितता आणि शांततेचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे. श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान ट्रस्टने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.



























































