
आधी पेट्रोल-डिझेलने शंभरी पार केली. आता ऐन दिवाळीत साखर शंभरी गाठेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. देशात सध्या अडीच महिने पुरेल इतकाच साखरेचा साठा शिल्लक आहे. सध्या देशाला दर महिन्याला 20 लाख टन साखरेची गरज असून देशात मात्र केवळ 54 लाख टन साखर शिल्लक आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत साखरेचा दर 100 रुपये पार करेल, असे वर्तवले जात आहे.
राज्यात दरमहा सरासरी तीन लाख टन साखर लागते, तर राज्यात 18 लाख टन साखर शिल्लक आहे. मात्र दिवाळीच्या मुहूर्तावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साखरेची मागणी वाढेल. दिवाळीआधीच खुल्या बाजारात साखरेचे दर 80 रुपये किलो झाले आहेत. त्यामुळे साखर लवकरच 100 रुपये किलोपर्यंत पोहोचेल, असे बोलले जात आहे.
राज्यातील साखर दक्षिणेकडील राज्यांनाही पुरवली जाते. त्यामुळे साखरेचा साठा व्यापारी करणार नाहीत याकडे आता पुरवठा विभागाची पथकांनी लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. राज्यातील सर्व साखर व्यापाऱ्यांना अन्नसाठा देखरेख पोर्टलवर त्यांच्याकडील साखरेच्या साठय़ाची त्वरित नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. पाऊस कमी असल्याने ऐन दिवाळीत साखरेचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गाळप हंगाम ऑक्टोबरपासून
साखरेचे दर नियंत्रणाबाहेर गेल्याने आता साखर गाळप हंगाम नोव्हेंबरऐवजी 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी आणि अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांची पथके त्यांच्या हद्दीतील साखर व्यापाऱ्यांकडून साठय़ाची पडताळणी करत आहेत. साखरेची साठेबाजी रोखण्यास अपयश आले तर साखरेचे भाव आणखी वाढतील, अशी भीती आहे.
केंद्र सरकारच्या हालचाली
केंद्र सरकारने साखर व्यापाऱ्यांवर स्टॉक लिमिट लावली आहे. 1 ऑगस्टपासून 30 नोव्हेंबरपर्यंत निर्बंध लागू असतील. डीलर एकाचवेळी एकाच ठिकाणी चार टनांपेक्षा जास्त साखर ठेवू शकत नाही. साखर मिळाल्यापासून 30 दिवसांपेक्षा जास्त काळ स्टॉक करून ठेवता येणार नाही. पेंद्र सरकारने राज्याला अतिरिक्त कोटा द्यावा, अशी मागणीही केली जात आहे.
20 हजार कोटींचा साखर घोटाळा
देशात साखरेचा कोणताही तुटवडा नसताना केवळ सणासुदीच्या काळात पृत्रिम टंचाई निर्माण करून साखरेचे दर वाढवण्यात आले आहेत, असा दावा करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी पेंद्र सरकारवर तब्बल 20 हजार कोटी रुपयांच्या साखर घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. यासंबंधी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. देशातील 48 लाख टन साखरेचा हिशेब लागत नसून, या घोटाळ्याला जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी अमित शहा व प्रल्हाद जोशी यांना विचारला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत साखर कारखाने आणि व्यापाऱ्यांच्या गोदामांची तातडीने तपासणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

























































