
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका रुग्णालयांमधील रुग्णसेवेबाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने खांदेपालट केला आहे. १२ ते १५ वर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेल्या शास्त्रीनगर, रुक्मिणीबाई रुग्णालयांतील ९ डॉक्टरांची उचलबांगडी केली असून त्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत.
पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय आणि कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. डॉ. पराग पाडवी, डॉ. विजय कुवर आणि डॉ. संदीप पगारे यांचा शास्त्रीनगर रुग्णालयात तर डॉ. संतोष केंभावी, डॉ. प्रशांत चौधरी आणि डॉ. कविता मढवी यांची रुक्मिणीबाई रुग्णालयात बदली करण्यात आली आहे. डॉ. विनोद दौंड यांची आरोग्य मुख्यालयात तर साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांची शास्त्रीनगर रुग्णालयात बदली झाली आहे. डॉ. पौर्णिमा ढाके यांना पुन्हा मढवी आरोग्य केंद्रात पदस्थापना देण्यात आल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी दिली.


























































