गर्लफ्रेंडच्या 3400 चुंबनांनी सजवली कार; एका दिवसात 55 लाख व्ह्यूज मिळाले, पोलिसांनी उतरवलं ‘आशिकी’चं भूत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजकाल सोशल मीडियावर रील बनवण्याचे फॅड वेगाने वाढत आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व जण सोशल मिडिया प्लॅटफॉर्म अर्थात इन्स्टाग्राम, फेसबुक, युट्यूबवर रील बनवताना दिसतात. रील बनवण्यासाठी आणि फॉलोअर्स वाढवण्याचा नाद कोणत्या थराला जाऊ शकतो याचा प्रत्यय मध्ये प्रदेशच्या ग्वालियर येथे घडलेल्या एका घटनेवरून येतो. येथील एका तरुणाने नवीन ट्रेंड सेट करण्यासाठी चक्क आपल्या कारवर प्रेयसीच्या चुंबनांची सजावट केली. त्याच्या या रीलला लाखो व्ह्यूजही मिळाले, मात्र ही ‘आशिकी’ तरुणाला चांगलीच महागात पडली असून ट्राफिक पोलिसांनी त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.

ग्वालियर येथील रहिवासी असणाऱ्या आदित्य सिकरवार याने सोशल मीडियावर नवीन ट्रेंड सेट करण्यासाठी गर्लफ्रेंडला चक्क कारवर चुंबन द्यायला सांगितले. परदेशातील ट्रेंडपासून प्रेरणा घेऊन त्याने हा प्रकार केला आणि त्याच्या प्रेयसीनेही लिपस्टिक लावून पांढऱ्या शुभ्र रंगाच्या कारवर चुंबन दिले. साडे तीन ते साडे चार तास हा प्रकार सुरू होता.

प्रेयसीने तब्बल 3400 चुंबन दिले आणि कार सजवली. कारचा दरवाजा असो, बॉनेट असो, डिकी असो किंवा कारचे पिलर्स…गाडीचा असा एकही कोपरा सोडला नाही जिथे प्रेयसीचे ओठ चुंबन द्यायला पोहोचले नाहीत. लिपस्टिकचे निशाण उमटल्यानंतर ही कार एखाद्या फिरत्या कॅनव्हाससारखी दिसायला लागली होती. रस्त्यावरून जाणारे लोकही ही अजब कार बघून थक्क होत होते, त्यामुळे ट्राफिकही झाले. बघता बघता व्हिडीओही व्हायरल झाला आणि एका दिवसात तब्बल 55 लाख व्ह्यूजही मिळाले.

रील व्हायरल झाली आणि ग्वालियर ट्रॅफिक पोलिसांची त्याच्यावर नजर पडली. पोलिसांनी कारच्या नंबर प्लेटवरून पोलिसांनी कारमालकाचा शोध घेतला. पोलिसांनी थाटीपूर भागातून कार ताब्यात घेतली. गाड्यांच्या बाह्य स्वरूपात असे बदल करणे आणि रस्त्यावर अशा स्थितीत गाडी चालवणे हे मोटार वाहन नियमांचे आणि रस्ता सुरक्षेचे थेट उल्लंघन आहे. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गाडी मालक आदित्य सिकरवारला पोलीस ठाण्यात बोलावले.

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी आदित्यला 5500 रुपयांचा दंड ठोठावला. एवढेच नव्हे तर, पोलिसांच्या देखरेखीखाली ती संपूर्ण लिपस्टिक कारवरून घासून साफ करायला लावली, अशी माहिती एसपी धर्मवीर यादव यांनी दिली.