पुण्यातील प्रसिद्ध बेकरीच्या मिठाईत सापडली अळी; ग्राहकाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यातील प्रसिद्ध ‘पॉल बेकरी’च्या मिठाईमध्ये अळी आढळल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या घटनेमुळे अन्न सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका युजरने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करत बेकरीचे पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचा दावा केला आहे. ही घटना पुण्यातील विमाननगर भागातील फिनिक्स मार्केटसिटी मॉलमध्ये असलेल्या ‘पॉल बेकरी’ची आहे. फ्रेंच कॅज्युअल डायनिंगसाठी देशभरात ओळख असलेल्या या पॉल बेकरीची एकूण 12 आऊटलेट्स आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन ताटं आणि पॉल बेकरीच्या पिशव्या दिसत असून, तो गोड पदार्थ काही प्रमाणात खाल्लेला आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये ग्राहक त्या पदार्थाचे थर बाजूला करताना दिसतो आणि आत एक जिवंत किडा सरपटताना स्पष्टपणे दिसून येतो. संबंधित ग्राहकाने पोस्टमध्ये म्हटले आहे की, काही महिन्यांपूर्वी त्यांनी विमाननगरच्या फिनिक्स मॉल आउटलेटमधून हे पार्सल घेतले होते, ज्यामध्ये त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. याप्रकरणी पॉल बेकरीकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

यापूर्वीही गुरुग्राममधील पॉल बेकरीच्या एका आऊटलेटमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. गुरुग्राममधील गोल्फ कोर्स रोडवरील वन होरायझन सेंटरमधील पॉल रेस्टॉरंटमध्ये एका ग्राहकाने सीझर सॅलड आणि इतर पदार्थ मागवले होते. सॅलडचा घास घेतल्यानंतर त्यात जिवंत किडा सरपटताना आढळल्याने ग्राहकाला मोठा धक्का बसला होता. त्या प्रकरणी रेस्टॉरंटने टेक्स्ट मेसेजद्वारे केवळ साधी माफी मागितली होती. मात्र, ग्राहकांच्या मते या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून केवळ आउटलेट चालवण्यावरच व्यवस्थापनाचे लक्ष केंद्रित असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.