ही केवळ महागाई नाही, तर सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे; वडेट्टीवार यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात सध्या अडीच महिने पुरेल इतकाच साखरेचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात साखरेचे भाव वाढले आहेत. तसेच दिवाळीपर्यंत साखरेचे दर शंभरी पार करेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ”ही केवळ महागाई नाही तर हा सर्व सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे”, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला.

”साखर निर्यात करणाऱ्या देशाला आज साखर आयात करण्याची वेळ आली आहे. ऊस उत्पादक आणि साखर उद्योगाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून साठेबाजांना अभय देणाऱ्या सरकारच्या धोरणांचा हा परिणाम आहे. सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या ताटातील साखरही महाग करण्याचे काम सरकारने केले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसपासून आता रोजच्या स्वयंपाकघरातील साखरेपर्यंत प्रत्येक गोष्टीवर महागाईचा फटका बसतोय. गरीब आणि मध्यमवर्गीय माणसाला चाळीस-पन्नास रुपयांची साखर सत्तर रुपयांपर्यंत विकत घ्यावी लागत असेल, तर ही केवळ महागाई नाही, तर सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे. महागाईच्या नावाने सत्तेत आलेल्या भाजपा आणि मोदी सरकारने आता स्वतःच्या काळातील महागाईकडेही पाहावे. जनतेला महागाईचे धडे देणाऱ्यांनी आधी स्वतःच्या सरकारला जाब विचारावा. साठेबाजांना संरक्षण देऊन सामान्य जनतेच्या खिशावर डल्ला मारण्याचे हे धोरण आता थांबले पाहिजे”, असे वडेट्टीवार म्हणाले.