
आजकाल मोबाईल, टॅबलेट आणि टीव्ही हे लहान मुलांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहेत. अनेक मुलांना कार्टून किंवा व्हिडीओ पाहिल्याशिवाय जेवणही करायचे नसते. अचानक मोबाईल काढून घेतल्यास मुलं रडणे, हट्ट करणे किंवा चिडचिड करणे सुरू करतात. अशा परिस्थितीत मुलांवर सतत ओरडण्याऐवजी काही सोपे नियम आणि पर्यायी उपक्रम वापरून स्क्रीन टाइम हळूहळू कमी करता येऊ शकतो.
मुलाला दिवसभर कधीही मोबाईल देण्याऐवजी स्क्रीन पाहण्याची निश्चित वेळ ठरवा. उदाहरणार्थ, जेवणानंतर ३० मिनिटे किंवा गृहपाठ पूर्ण केल्यानंतर ठरावीक वेळ स्क्रीन पाहण्याची परवानगी देता येईल.
एक छोटे टाइमटेबल तयार करून त्यात अभ्यास, खेळ, जेवण आणि स्क्रीन टाइमची वेळ लिहिल्यास मुलाला दिनक्रम समजणे सोपे जाते.
मुलगा व्हिडीओ किंवा गेममध्ये गुंग असताना अचानक मोबाईल बंद केल्यास तो नाराज होऊ शकतो. त्यामुळे स्क्रीन टाइम संपण्यापूर्वी त्याला सूचना द्या.
दहा मिनिटे बाकी असताना सांगा, त्यानंतर पाच मिनिटांनी आणि शेवटी दोन मिनिटांनी पुन्हा आठवण करून द्या. टाइमर लावण्याची पद्धतही वापरता येते.
डायनिंग टेबल, बेडरूम किंवा झोपण्यापूर्वीचा काही वेळ स्क्रीन-फ्री ठेवता येईल. मात्र, हे नियम फक्त मुलांसाठी न ठेवता संपूर्ण कुटुंबाने पाळणे अधिक प्रभावी ठरते.
पालक जेवताना स्वतः मोबाईल दूर ठेवतील, तर मुलांनाही तो नियम पाळणे सहज शक्य होईल.
‘मोबाईल बंद कर’ एवढेच सांगून थांबू नका. त्याऐवजी मुलाला पझल्स, ड्रॉइंग, कलरिंग, ब्लॉक्स, बोर्ड गेम, बॉल खेळणे किंवा क्राफ्टसारख्या उपक्रमांमध्ये गुंतवा.
लहान मुलांसाठी वस्तूंचे वर्गीकरण, शेप मॅचिंग किंवा खेळणी व्यवस्थित लावण्यासारखे उपक्रमही मनोरंजक ठरू शकतात.
स्क्रीन टाइम कमी करताना मुलं सुरुवातीला नाराज होऊ शकतात. त्यांचा राग समजून घ्या, मात्र प्रत्येक वेळी रडल्यावर स्क्रीन टाइम वाढवू नका. अन्यथा मुलाला रडणे किंवा हट्ट केल्यावर अधिक वेळ मोबाईल मिळतो, अशी सवय लागू शकते.
मुलांची स्क्रीनची सवय एका दिवसात बदलत नाही. ठरावीक वेळ, आधी सूचना आणि स्क्रीनच्या पर्यायांमध्ये सातत्य ठेवल्यास हळूहळू बदल घडवून आणता येतो.



























































