रशिया-युक्रेन युद्धाच्या तणावादरम्यान मॉस्कोत उतरले अमेरिकेचे लष्करी विमान, काय आहे कारण?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामध्ये प्रचंड तणाव आहे. अशातच मंगळवारी अमेरिकन हवाई दलाचे एक अवाढव्य लष्करी परिवहन विमान अचानक रशियाची राजधानी मॉस्को येथे उतरले आहे. या C-17 ग्लोबमास्टर III विमानाच्या अनपेक्षित लँडिंगमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

फ्लाइट रडार २४ या विमान ट्रॅकिंग वेबसाइटच्या आकडेवारीनुसार, अमेरिकन हवाई दलाचे हे बोईंग C-17A ग्लोबमास्टर विमान लाटवियाची राजधानी रीगा येथून उड्डाण करून थेट मॉस्कोच्या वनुकोवो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. याआधी २३ ऑगस्ट रोजी हे विमान अमेरिकेतील मेरीलँड येथील जॉइंट बेस अँड्र्यूज या तळावर होते. विशेष म्हणजे हा तोच हवाई तळ आहे जिथून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि इतर वरिष्ठ अधिकारी आपल्या अधिकृत प्रवासासाठी उड्डाण करतात.

विमानाबाबत आमच्याकडे माहिती नाही – क्रेमलिन

या विमानाबाबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कार्यालय असलेल्या क्रेमलिनने अनभिज्ञता व्यक्त केली आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे की, “आमच्याकडे या विमानाबाबत किंवा त्याच्या मॉस्कोमधील लँडिंगबाबत कोणतीही माहिती नाही.” तसेच, या आठवड्यात मॉस्कोमध्ये अमेरिकन प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोणतीही अधिकृत बैठक नियोजित नसल्याचे रशियन माध्यमांनी म्हटले आहे. दुसरीकडे अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांनीही अद्याप या घडामोडीवर कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही.