दिग्दर्शक कुकू कोहली यांचे निधन, वयाच्या 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध दिग्दर्शक कुकू कोहली यांचे निधन झाले असून, वयाच्या 77 व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुकू कोहली यांचे खरे नाव संदेश कोहली होते. गेल्या अनेक दशकांपासून ते हिंदी चित्रपटसृष्टीशी जोडलेले होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. कुकू कोहली यांच्या निधनाची माहिती त्यांचे जवळचे मित्र आणि चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, कुकू कोहली यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांना वाचवण्यात यश आले नाही.

अशोक पंडित यांनी कुकू कोहली यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना ते पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सांगितले. त्यांच्या अचानक निधनाने चित्रपटसृष्टीतील अनेकांना धक्का बसला आहे.

कुकू कोहली यांचे नाव अजय देवगण यांच्या चित्रपट कारकिर्दीशी विशेषतः जोडलेले आहे. त्यांनी अजय देवगणला ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिली संधी दिली. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून अजय देवगण यांनी अभिनेता म्हणून पदार्पण केले आणि पुढे ते हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक बनले. कुकू कोहली यांनी ‘फूल और कांटे’नंतरही अजय देवगण यांच्यासोबत काम केले. त्यांच्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या काळात कुकू कोहली यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.

कुकू कोहली यांनी केवळ दिग्दर्शक म्हणूनच नव्हे, तर चित्रपटसृष्टीतील संघटनात्मक पातळीवरही काम केले. ते इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे (IFTDA) सरचिटणीस म्हणून दीर्घकाळ कार्यरत होते. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीने एक अनुभवी दिग्दर्शक आणि मार्गदर्शक गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.