भाड्याने घर शोधण्यासाठी होणारी वणवण थांबणार, म्हाडाचे रेंटल हाउसिंग पोर्टल नववर्षात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परवडणाऱ्या दरात घराचे स्वप्न पूर्ण करणारे म्हाडा आता सर्वसामान्यांना त्यांच्या बजेट आणि पसंतीनुसार राज्यभरात भाड्याने घरेही उपलब्ध करून देणार आहे. यासाठी म्हाडा स्वतःचे रेंटल हाउसिंग पोर्टल लाँच करणार असून हे पोर्टल तयार करण्यासाठी या महिनाअखेरीस एजन्सीची नेमणूक करणार आहे. नववर्षाच्या सुरुवातीला हे पोर्टल सुरू होणार आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, मुंबईसह एमएमआरमध्ये ग्रोथ हब उभारले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात भाड्याच्या घरांना मोठी मागणी असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने म्हाडाच्या माध्यमातून रेंटल हाउसिंग पॉलिसी तयार केली असून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नो ब्रोकर, मॅजिकब्रिक्सच्या धर्तीवर म्हाडा स्वतःचे पोर्टल लाँच करणार आहे.

दलालांकडून होणारी लूट थांबणार

म्हाडाच्या या पोर्टलमुळे घर भाड्याने घेण्यासाठी किंवा देण्यासाठी दलालांवर विसंबून राहण्याची गरज भासणार नाही.

विशेष म्हणजे भाडे करारनामा, पोलीस व्हेरिफिकेशन यासारख्या सुविधाही या पोर्टलवर उपलब्ध असणार आहेत.