
रायगडचे पालकमंत्री कोणाला करायचे यावरून गेले काही महिने जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गट व शिंदे गटात चढाओढ सुरू होती. त्यावरून राजकारण तापले. अगदी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. मात्र पेण तालुक्याच्या विकासाकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे झाली तरी पेणच्या गौळावाडी व पावटावाडीत जायला साधा रस्तादेखील नाही. ऐन पावसाळ्यात आदिवासींचे प्रचंड हाल होत असून रुग्ण, गर्भवतींना डोलीतूनच रुग्णालयापर्यंत प्रवास करावा लागत आहे. कच्च्या, दगड-धोंड्यांच्या रस्त्यांवरून जाताना अनेक गाड्या घसरून पडत असल्याने चालकांचा जीव धोक्यात आला आहे. आमच्या च्या वाड्यांमध्ये जायला तुम्ही रस्ता करू शकत नसाल तर विकासाच्या कसल्या बाता मारता, असा संतप्त सवाल आदिवासी ग्रामस्थांनी केला आहे.
गौळावाडी आणि पावटावाडी या दोन वाड्या मिळून जेमतेम ८० कुटुंबे राहतात. वाड्यांचा कारभार पाबळ ग्रामपंचायतीच्या अंतर्गत चालतो. पण ग्रामस्थांना प्राथमिक सुविधादेखील मिळत नाहीत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलेटीपासून दोन वाड्यांकडे जाणारा रस्ता हा जांबोशीपर्यंत व्यवस्थित आहे. मात्र जांबोशी गावापासून आदिवासी वाडीपर्यंतचा रस्ता अतिशय बिकट आहे. चिखल, खड्डे तुडवून स्थानिकांना जावे लागते. पावसाळ्यात तर आजारी व्यक्ती किंवा गर्भवती महिलेला रुग्णालयात नेताना अडीच कि. मी. अंतर हे डोलीतून कापावे लागते.
निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा
गौळावाडी आणि पावटावाडीतील ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुर्दशेविरुद्ध गावात बैठक घेतली. गेली अनेक वर्षे येथील आदिवासींना रस्त्याअभावी मरणयातना भोगाव्या लागत आहेत. त्यामुळे जोपर्यंत चांगला रस्ता बांधून मिळत नाही तोपर्यंत सर्व निवडणुकींवर बहिष्कार घालण्याचा इशारा नारायण खंडवी, अनिल खंडवी, हिरामण खंडवी, लक्ष्मण लेंडी, काशिनाथ खंडवी, भाऊ दोरे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
आदिवासी बांधवांनी पिकवलेले धान्य तसेच शेतमाल ाच्या विक्रीसाठी बाजारपेठेपर्यंत डोक्यावरून घेऊन जावे लागते. खराब रस्त्यामुळे गौळावाडी व पावटावाडीपर्यंत जाण्यास वाहनचालक सपशेल नकार देतात.
दोन्ही आदिवासी वाड्यांपर्यत चांगला रस्ता करावा या मागणीसाठी लवकरच पाल कमंत्री व स्थानिक खासदारांना निवेदन देण्यात येणार आहे. स्थानिक प्रशासनानेदेखील आदिवासी वाड्यांकडे दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे.
रस्ता खराब असल्यामुळे गर्भवती महिला व आजारी माणसांना रुग्णालयात नेण्यासाठी डोलीचा वापर करावा लागतो. माझ्या मुलीच्या वेळी खूप मुसळधार पाऊस होता. गाववाल्यांनी डोलीला मेणकापड लावून तिला दवाखान्यात दाखल केले असल्याचे ग्रामस्थ वामन खंडवी यांनी सांगितले.


























































