IVF च्या जाहिरातीत दाखवली निळ्या रंगाची बाळाची बुटं, नऊ सरोगसी केंद्रांवर कारवाई; नोंदणी निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानमध्ये निळ्या रंगाच्या बाळाच्या बुटांची जाहिरात करणे एका रुग्णालयाला महागात पडलंय. या जाहिरातीत निळ्या रंगाचा वापर पुरुष बाळाशी संबंधित असल्याचे मानले गेल्याने आणि त्यातून लिंगनिवडीशी संबंधित सेवांना प्रोत्साहन दिल्याचा प्रथमदर्शनी संशय निर्माण झाल्याने राजस्थान सरकारने एका रुग्णालयाशी संबंधित नऊ सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (ART) केंद्रांसह एका ART बँक आणि एका सरोगसी क्लिनिकची नोंदणी तत्काळ प्रभावाने निलंबित केली आहे.

आरोग्यमंत्री गजेंद्र सिंह खिमसर यांनी सांगितले की, राज्यातील सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान आणि सरोगसी सेवांसंदर्भातील नियमांचे प्रथमदर्शनी उल्लंघन आढळल्यानंतर सोमवारी ही कारवाई करण्यात आली. Neelkanth Fertility and Women Care Hospital Pvt Ltd द्वारे चालवण्यात येणाऱ्या संबंधित केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

वैद्यकीय आणि आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव गायत्री राठोड यांनी सांगितले की, Assisted Reproductive Technology (Regulation) Act, 2021 मधील तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. जयपूरमधील एका इंग्रजी वृत्तपत्राच्या आवृत्तीत IVF, फर्टिलिटी आणि टेस्ट-ट्यूब बेबी सेवांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीत निळ्या रंगाचे बाळाचे बूट दाखवण्यात आले होते.

विभागाच्या मते, निळा रंग पुरुष बाळाशी संबंधित असल्याचे मानले जाते. त्यामुळे या जाहिरातीचा प्रथमदर्शनी अर्थ लिंगनिवडीशी संबंधित सेवांना प्रोत्साहन देणारा असा काढण्यात आला. ART कायद्यानुसार लिंगनिवड तसेच लिंगनिवडीशी संबंधित ART प्रक्रिया प्रतिबंधित आहेत.

निलंबित करण्यात आलेल्या नोंदण्यांमध्ये भिलवाडा येथील एक ART लेव्हल-१ क्लिनिक, तसेच कोटा, उदयपूर, अजमेर आणि जोधपूर येथील प्रत्येकी एक ART लेव्हल-२ क्लिनिक यांचा समावेश आहे. याशिवाय जयपूरमधील दोन ART लेव्हल-२ क्लिनिक, एक सरोगसी क्लिनिक आणि एका ART बँकेची नोंदणीही निलंबित करण्यात आली आहे.

या सर्व नोंदण्या पुढील आदेशापर्यंत निलंबित राहणार आहेत. राजस्थानमधील ART आणि सरोगसी सेवा निर्धारित कायदे, नियम आणि नैतिक निकषांनुसारच चालवणे बंधनकारक असल्याचे गायत्री राठोड यांनी स्पष्ट केले.

लिंगनिवडीसारख्या प्रतिबंधित पद्धतींचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रमोशन कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशाराही गायत्री राठोड यांनी दिला.