
कितीही बेफाम हायवा चालवला, कितीही जणांना चिरडले तरी लाचार, लोचट आणि मिंधे असलेले पोलीस आपले काही वाकडे करणार नाहीत, अशा मस्तीत असलेल्या वाळू तस्कराच्या सुसाट हायवाने एका सात वर्षांच्या चिमुरडीला अक्षरशः चिरडले. पोटाची खळगी भरण्यासाठी उत्तरप्रदेशातून आलेल्या मजुराच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण पोलिसांना गरिबांचे अश्रू पुसण्यासाठी कुठेय वेळ? चिमुरडीचा बळी घेणाऱ्या हायवाचालकाला वाचवण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा राबत होता.
उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथून कृष्णा तिवारी कुटुंबकबिला घेऊन छत्रपती संभाजीनगरात पोट भरण्यासाठी आले. वाळूज औद्योगिक वसाहतीत एकलहेरा येथील गट क्र. २७ मध्ये असलेल्या साईश्रद्धा इंडस्ट्रीजमध्ये त्यांना काम मिळाले. राहायलाही तेथेच जागा मिळाली. कृष्णा तिवारी यांना चार मुली आणि एक मुलगा. नंदिनी (१६) आणि आरुषी यांच्यासह दोन लहान बहिणी विटावा येथील खासगी शाळेत शिक्षण घेत आहेत.
मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता शाळा सुटल्यावर दोघी शाळेच्या बसने घरी परतल्या. बसमधून उतरल्यानंतर घराकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना सुसाट आलेल्या विनाक्रमांकाच्या वाळूच्या हायवाने दोघींना उडवले. आरूषी ही मागच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. नंदिनीला तात्काळ उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नागरिकांनी हायवा चालकाला पकडले. संतप्त नागरिकांनी हायवाच्या काचा फोडून चालकाला ताब्यात घेतले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. संतप्त नागरिकांनी बेफाम हायवाबद्दल जाब विचारला. वाळू तस्करांची गुलामी करणाऱ्या पोलिसांनी जाब विचारणाऱ्या नागरिकांकडे दुर्लक्ष करून हायवाचालकाला सुरक्षा देत तेथून बाहेर काढले.
आमदार साहेब… हा भागही आपल्याच मतदारसंघात
गंगापूर तालुका हा वाळूपट्ट्यासाठी ओळखला जातो. या वाळूपट्ट्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्या तस्करांच्या विरोधात भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. त्यानंतर गोदावरी, शिवना नदीपात्रातील वाळूपट्ट्यांवर धाडी टाकण्यात आल्या. वाळू तस्करांची चाकरी करणाऱ्या गंगापूर येथील पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी करण्यात आली. एमआयडीसी वाळूज परिसरही आमदार बंब यांच्या मतदारसंघातच येतो. मात्र येथील वाळू तस्करीकडे त्यांचे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला.
विटावा, आंबेलोहळ परिसरातील तिसरी घटना
कासोडा, विटावा, आंबेलोहळ या परिसरातून राजरोसपणे औद्योगिक वसाहतीमध्ये वाळूची तस्करी सुरू आहे. रात्री-अपरात्री सुरू असलेल्या या वाळू तस्करांच्या हायवांनी आतापर्यंत तिघांचा बळी घेतला आहे. विटावा गावातून वाहतूक करणाऱ्या हायवा जोरात चालवित असल्याने गावकऱ्यांनी तब्बल १८ गतिरोधक टाकले. मात्र, हायवाचालक या गतिरोधकाला न जुमानता भरधाव वाहन पळवतात.
मालवाहू पिकअपने महिला कामगारास चिरडले
एमआयडीसी वाळूज परिसरातील मेटलमॅन ऑटो कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करत असलेली आरती फुलारे ही महिला शिफ्ट संपल्यानंतर घराकडे जात होती. सायंकाळी ७.१५ वाजता औद्योगिक वसाहतीतील मटेरिअल पोहोचविणारा पिकअप एफडीसी चौकाच्या दिशेने जात होता. त्याने फुलारे यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात आरती फुलारे पिकअपच्या चाकाखाली चिरडली गेली. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. नागरिकांनी तत्काळ मदत करून तिला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासन ‘ब्रेन डेड’ घोषित केले.


























































