
2047 मध्ये आपल्याला अपेक्षित असलेल्या जगाचे चित्र मांडताना, आज जे जगभरात प्रमुख नेते दिसत आहेत. कदाचित ते पुढे दिसणार नाहीत. एक दिवस नक्की असा येईल की, जेव्हा अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे पुतीन, चीनचे शी जिनपिंग, तुर्कस्थाचे एर्दोगन हे सर्व जण नसतील आणि त्यावेळी आपल्या हिंदुस्थानात जैविक पंतप्रधान असतील, असे परखड मत ओडिशा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश एस. मुरलीधर यांनी व्यक्त केले.
नवी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये ‘माझी भारताची संकल्पना ः 2047 एडी’ या विषयावर डी. एस. बोरकर स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते जैविक नसल्याचे विधान केले होते. या विधानावरून मोदी यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. परंतु पहिल्यांदाच एका न्यायाधीशाने थेट नाव न घेता मोदी यांच्यावर टीका केली आहे. 20 वर्षांनंतर 2047 साली भारताचे चित्र कसे असेल, असे एक वर्णनही न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांनी केले. तसेच एखाद्या गटाला कपडे किंवा त्यांच्या खानपानावरून लक्ष्य करण्यासाठी कायद्याचा वापर व्हायला नको. सत्ताधाऱयांनी पुढील 20 वर्षांत आपल्यावर होणाऱ्या टीकेलाही वाव दिला पाहिजे, असे सांगून त्यांनी आंदोलकांवर झालेल्या फौजदारी कायद्याचा निषेध केला. मूलभूत हक्क नाकारल्याबद्दल शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सरकार कायद्याचा वापर करणार नाही. 2047 मधील भारत आणखी आशादायी असेल, असेही ते म्हणाले.
जेन–झीचा बेधडकपणा आवडला
जुलै महिन्यात झालेल्या आंदोलनातून आजची तरुण पिढी ही राजकीय संदेशाचा आंधळेपणाने स्वीकार करण्याऐवजी त्याला आव्हान देण्यास तयार आहे, असे ते म्हणाले. जेन–झीचा हा बेधडकपणा निश्चितच लोकशाहीच्या प्रगतीचे लक्षण आहे. ही पिढी करुणा आणि सत्यनिष्ठsला महत्त्व देते. सत्ताधाऱयांना प्रश्न विचारण्यात ही पिढी अजिबात कचरत नाही.

























































