
अमरावती जिह्यातील सर्व मोठय़ा आस्थापनांचे फायर ऑडिट व फायर ड्रिल एक महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरीन) बालके मृत्यूच्या घटनेची अतिशय गंभीर दखल चंद्रशेखर बावनकुळे घेतली. ही घटना 24 ऑगस्ट रोजी पहाटे 3.30 वाजता घडल्यानंतर सकाळी चारवाजेपासून संबंधित सर्व यंत्रणांशी संपर्क साधून आवश्यक निर्देश दिले. 36 नवजात बालकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने इतर रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
7 दिवसांत समितीचा अहवाल येणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्यमंत्री व आरोग्य सचिवांना तातडीने घटनास्थळी पाहणी करण्यासाठी पाठविले होते. त्यांनी दुपारी 1.30 वाजता घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आरोग्य आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यीय समिती गठित करण्यात आली असून, सात दिवसांच्या आत समितीने वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



























































